सध्याची राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी : राधाकृष्ण विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 07:59 PM2020-01-29T19:59:24+5:302020-01-29T20:00:43+5:30
... त्यामुळे मी सुध्दा निरीक्षकाची भूमिका घेतली.
पुणे : सध्याची राजकीय स्थित्यंतरे तरुण पिढी पहात असून राज्यातील राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी आहे. कधीही एकत्र न येणारे आता एकत्र आले आहेत. त्यामुळे मी सुध्दा निरीक्षकाची भूमिका घेतली आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, कॉमनवेल्थ युथ कौंन्सिल, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित पाचव्या युवा संसदेच्या उद्घाटन प्रसंगी विखे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, युवा संसदेचे अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर, डॉ.श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमणप्रीत यांना आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दरम्यान, युवा संसदेस महाराष्ट्रातील विविध भागातून 2 हजाराहून अधिक युवक आले होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, चांगले युवा निर्माण होण्याकरीता महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्या. महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घालणे चुकीचे आहे. आम्ही अशाच निवडणुकांमधून तयार होत पुढे आलो.युवक उद्याचे भविष्य आहेत, हे वाक्य केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता. त्यांना चांगल्या संधी मिळायला हव्यात.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, राजकारणात येण्याकरीता नेतृत्वगुणांची साधना करणे आवश्यक आहे. सरकार चालविणे, नेता बनणे हे सोपे नाही. त्याकरीता प्रशिक्षण व अनुभव असणे गरजेचे आहे. युवकांनी राजकारणात येत आपल्यामधील गुणसंपदा वाढवायला हवी.
----------------------------------
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहाटे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच राज्यपालांनी पहाटे ५ वाजता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटविली.त्यानंतर सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावर आले.तर काही दिवसांनी भाजप विरहित तीन पक्षांचे सरकार आले, ही अघटीत घटना होती. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत ? असे कधी घडले नव्हते. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीचा अभ्यास सुध्दा विद्यार्थ्यांनी करायला हवा,असे आवाहन खासदार गजानन किर्तीकर यांनी केले.
...............