पुणे : सध्याची समाजातील स्थिती आणीबाणीची, कसोटीची आणि समाजशिक्षणाला मध्ययुगात घेऊन जाणारी आहे. घटनेतल्या मूल्यांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कसोटीच्या काळात समाजशिक्षणातील कार्यकर्त्यांनी ताठपणे उभे राहणे गरजेचे आहे. समाजाच्या मानसिक उत्थापनासाठी समाजशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. राज्य साधन केंद्रातर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक व डॉ. चित्राताई नाईक समाजशिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक प्रा. रमेश पानसे यांना व्यक्तिगत पुरस्कार आणि पालघर जिल्ह्यातील मासवण येथील आदिवासी सहज शिक्षण परिवारास संस्थात्मक पुरस्कार देण्यात आला. या वेळी माजी शिक्षण संचालक एस. एन. पवार, अल्पसंख्याक व प्रौैढ शिक्षणाचे संचालक नंदन नागरे, भारतीय शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा अरुणा गिरी, राज्य साधन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम, संचालक मेहबूब इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.कोतापल्ले म्हणाले, ‘‘सध्या सर्वत्र खासगीकरणाचा रेटा सुरू आहे. सरंजामी मनोवृत्ती सर्वदूर पसरली आहे. दलितांवरील अन्यायाची, अत्याचाराची कोणी चर्चाही करीत नाही. स्वातंत्र्य ही संकल्पना सध्या कितपत अस्तित्वात आहे, याबाबत शंका निर्माण झाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी समाजशिक्षणाच्या कक्षेत याबाबत ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे. कारण, शासनाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे. ही उदासीनता झटकून, घटनेतील मूल्ये जपत शिक्षणाचा पाया रचणे हे समाजशिक्षणापुढील मोठे आव्हान आहे. औैपचारिक आणि अनौैपचारिक शिक्षणातील धडाडीच्या कार्यकर्त्यांनी ताठपणे उभे राहून सध्याच्या समस्यांचा सामना करीत समाजशिक्षणाला तारले पाहिजे.’’ नंदकुमार निकम यांनी अध्यक्षीय भाषणात समाजशिक्षण पुढे नेण्याची आणि रुजवण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सद्य परिस्थिती आणीबाणीची
By admin | Published: October 15, 2015 1:01 AM