Pune Lok Sabha Result 2024| पुणे : सकाळी आठ वाजल्यापासून मतमाेजणीला सुरवात झाल्यापासून पुणे मतदारसंघात चुरस पाहायला मिळत आहे. कधी काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर कधी भाजपचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ (Murlidhar Mohol हे आघाडी घेत आहेत. चौथ्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी २१ हजारांची आघाडी घेतली आहे. तर दुस-या फेरीनंतर मोहोळांना १८ हजारांची आघाडी होती. परंतू, मतमाेजणीला सुरवात झाल्यापासून आघाडी- पिछाडी हा पाठशिवणीचा खेळ सातत्याने सूरू आहे.
पुणे मतदारसंघाच्या निकालाकडे केवळ पुणेकरांचेच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे. वरकरणी मीच निवडून येणार असे धंगेकर, माेहाेळ आणि वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार वसंत माेरे हे मीच निवडून येणार असा दावा करत असले तरी, शेवटपर्यंत म्हणजे ३ जूनपर्यंत येथे नक्की माेहाेळ निवडून येणार की धंगेकर बाजी मारणार याबाबत काेणालाही स्पष्टता नव्हती. तीच परिस्थिती सध्या निवडणुकीच्या मतमाेजणीदरम्यानही दिसून येत आहे. काेणत्याही उमेदवाराला माेठया प्रमाणात लीड मिळत नसल्याने नक्की काेण निवडून येणार? काेणाच्या बाजुने पारडे झुकते आहे याबाबत अजुनही संभ्रम कायम आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील पेट्यांची मतमोजणी काही काळ थांबविण्यात आली आहे. मतमोजणीतील आकडे चार मिनिटे उशिरा दिसत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.