घोडेगाव (पुणे) : देश सुरक्षित राहाण्यासाठी संविधान सुरक्षित राहिले पाहिजे. सध्या संविधान व लोकशाही दोन्ही धोक्यात आले आहेत. देशात लोकशाही मार्गाने निर्माण झालेली सरकारे एका रात्रीत पैशाच्या जोरावर हस्तांतरित झाली आहेत, हे संविधानाला मान्य नाही, अशी टीका राज्याचेे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आयोजित संविधान सन्मान सभेत केली.
घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुभाष मोरमारे, कैलासबुवा काळे, संजय गवारी, नंदकुमार सोनावले, संतोष भोर, प्रकाश घोलप, सखाराम पाटील काळे, गणपत इंदोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गौतम खरात यांनी प्रास्ताविक केले, तर संपतराव गारगोटे यांचे व्याख्यान झाले. आभार विठ्ठल टिंगरे यांनी मानले.