पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा कोरोना आढावा बैठक झाली. त्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलतेबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र अद्यापही राज्य सरकारचे कोणतेही स्पष्ट आदेश न आल्याने, पुण्यातील निर्बंधांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आता जे निर्बंध आहेत, त्यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान शनिवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना येत्या दोन दिवसात राज्य शासनाकडून निर्णय जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
महापालिका हद्दीत सध्या लागू असलेले सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियम व निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. त्यामुळे व्यापारी तसेच हॉटेलचालकांना निर्बंधांमधील सवलतींसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. व्यापारी मात्र या निर्बंधांमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. कारण गेल्या दीड वर्षांपासून दुकाने बंद होती. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. त्यात आता सर्व सुरळीत होत असताना निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. पण अजूनही विकेंड लॉकडाऊन सुरूच आहे. तसेच इतर दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. या पार्श्वभूमीवर किमान गृहमंत्र्यांच्या जिल्हा कोरोना आढावा बैठकीत तरी काही निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे.
------------------------
पुर्वीचे आदेश लागू
महापालिका हद्दीत पुढील आदेशापर्यंत सध्याचेच (२६ जून, २ जुलै व १५ जुलै २०२१ रोजी लागू केलेले) नियम कायम लागू राहणार आहेत. यानुसार, पुणे महापालिकेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही लागू असतील.
----------------------
निर्बंधांचे ओझे कशाला ?
सध्या शहरात लॉकडाऊन असले तरी ते दिसून येत नाही. कारण रात्री देखील नागरिकांचे ये-जा सुरू आहे. पोलीसांचा पुर्वीचा बंदोबस्त आता काहीसा कमी झालेला दिसून येतो. तसेच कोरोना रूग्णसंख्या ही कमी आहे. त्यामुळे एकूणच सर्व काही सुरळीत असताना निर्बंधांचे ओझे कशाला, असा सवाल नागरिक, व्यापारी विचारत आहेत.
---------------------