जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीनंतर नाट्यसंस्कार कला अकादमीच्या कलाकारांनी रंगमंचावर हजेरी लावली. ज्योत्स्ना भोळे सभागृहात रविवारी (दि.27) अभिवाचन महोत्सव रंगला. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या नव्या आणि जुन्या कलाकारांनी सहा बालनाट्याचे अभिवाचन केले. प्रकाश पारखी लिखित आणि दिग्दर्शित बिन कपडयांचा राजा या बालनाटयाच्या अभिवाचनाने महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर धनंजय सरदेशपांडे लिखित आणि दीपक काळे दिग्दर्शित ’गांधी व्हायचं आम्हाला’, ’प्रिय बाबा’ या बालनाटयाचे वाचन झाले. या बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन अंजली दफ्तरदार यांनी केले आहे. निसर्गाचा -हास होऊ न देण्याची या मुलांची तळमळ याचे मनाला भिडणारे अभिवाचन ’सावल्या’ या बालनाट्याद्वारे झाले. हट्टीपणा केल्यामुळे जीवावर ओढवलेल्या प्रसंगातून चातुर्याने कसाबसा बाहेर पडलेला छोटासा मासा दिसला तो पिटुकल्याची गोष्ट यामध्ये. याचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते राजश्री राजवाडे-काळे यांनी. अत्यंत बडबड्या पण चतुर मुलाने आईशी लावलेली एक तास न बोलण्याची पैज मोडून छोट्या मित्राच्या संकटप्रसंगी धावून जात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवित आईचे जिंकलेले मन हे अळी मिळी गुपचिळी या बालनाट्यात दिसून आले. संध्या कुलकर्णी यांनी या बालनाट्याचे लेखक व दिग्दर्शन केले होते.
नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात, संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी बालनाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. पण सध्याच्या परिस्थितीत बालनाट्य महोत्सव भरविणे शक्य नसल्याने बालनाट्य अभिवाचन महोत्सव घेण्यात आल्याचे सांगितले. श्रीया देशपांडे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
----------------------------------------------------------------