चाकण : तीन जिवंत काडतूस व देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्या एकास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी (दि. ७) आंबेठाण चौक (चाकण, ता. खेड, जि. पुणे) येथील हॉटेल ब्ल्यू सहारा समोरील परिसरातून ताब्यात घेतले आहे. सोन्या झगडे (वय २२, रा. चाकण ता. खेड, जि. पुणे ) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. चाकण परिसरात बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल घेवून संबंधित युवकाकडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहा. पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, शंकर जम, शरद बांबळे, रउफ इनामदार, सुनील जावळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. पिस्तुलासह संबंधित युवकास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या काही साथीदारांची चाकण पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.
जिवंत काडतुसे, पिस्तुल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 4:02 PM