सोलापूर / पिंपरी : केंद्रीय सीमाशुल्क पुणे विभागाने आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करण्याचा डाव उधळून लावला. या कारवाईमध्ये सुमारे ६५ लाख रुपये किंमतीचा ४१२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.
आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्या नुसार सीमाशुल्क विभागाने नळदुर्ग ते सोलापूर दरम्यानच्या महामार्गावर ४ ऑक्टोबरला अचानक नाकेबंदी करून वाहनांची जोरदार तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान मोठी रंग लागली होती. नाकेबंदी पासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर एक ट्रक चालू अवस्थेत ठेवून चालक पसार झाल्याचे तपासणी पथकाच्या लक्षात आले. ट्रकची तपासणी केली असता छतावर पोकळी केल्याचे लक्षात आले. या पोकळीमध्ये २०६ प्लास्टिकच्या पाकिटात ४१२ किलो गांजा आढळला. सीमाशुल्क विभागाने ट्रकसह ८५ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.
केंद्रीय सीमाशुल्क पुणे विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे-ठोंबरे म्हणाल्या, सीमाशुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार अचानक तपासणी करण्यात आली. तपासणी होत असल्याचे पाहताच चालक (एमएच १३, सीयू ३१९२ ) या क्रमांकाचा ट्रक चालू अवस्थेत सोडून पळून गेला. दोन महिन्यांपूर्वी सीमाशुल्क विभागाने आंध्रप्रदेशातून आलेला ८०० किलो गांजा जप्त केला होता.