बाजारपेठा फुलल्या : रांगोळ्यांच्या पायघड्या घालून स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोन महिन्यांपासून बंद असणाऱ्या बाजारपेठा मंगळवारी (दि. १) खुल्या झाल्या. या वेळी दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी ‘ग्राहक येती दुकाना, तोचि दिवाळी दसरा’...या भावनेतून ग्राहकराजाचे स्वागत केले.
सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवांव्यतिरीक्त अन्य दुकाने उघडण्याची परवागनी प्रशासनाने दिली. त्यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते. कोणी गुलाबपुष्प आणि पेढा देऊन ग्राहकांचे स्वागत केले. ‘करूनी घेऊ आपण व्हॅक्सिनेशन, सुरक्षित करू बाजारपेठ आणि नेशन’, ‘पाऊले चालती दुकानाची वाट, मास्क वापरून खरेदी करू, आपण राहू स्मार्ट’ असा संदेश देणाऱ्या ‘पुणेरी’ रांगोळ्यांच्या पायघड्या घालून कोणी स्वागत केले. ग्राहकांच्या हातावर आधी ‘सॅनिटायझर’रुपी तीर्थ शिंपडून मगच ग्राहकाला दुकानात घेतले जात होते.
थंडावलेले अर्थचक्र पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, दुकानदारांचे चेहरे फुललेले होते. ग्राहकांनीही उत्साही गर्दी केल्यामुळे टाळेबंदी उठवल्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांचा गल्ला चांगलाच भरला. मध्य पुण्यातल्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी उसळली होती. लक्ष्मी रस्ता, मंडई परिसरातील खोदकामांमुळे बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, शनिपार आदी ठिकाणी नेहमीच्या ओळखीची असणारी वाहतूककोंडी, वाहनांच्या ‘हॉर्न’चा कोलाहल, ‘पार्किंग’ मिळवण्यासाठीची धांदल या सर्वांचा अनुभव पुणेकरांना घेता आला.
चौकट
दुकानाला तोरणे
एरवी सकाळी ९ किंवा १० शिवाय ‘शटर’ वर न घेणाऱ्या अनेकांनी सकाळी सातपासूनच दुकाने उघडली. तत्पूर्वी दुकानांची साफसफाई करून काही दुकानदारांनी तोरणे लावून दुकाने सजवली. दुकानातल्या देवतांची पूजा करुन ग्राहकराजाच्या सेवेत ते रुजू झाले. तुळशीबागेतही सकाळी सातपासूनच लगबग होती. मध्य पुण्यातल्या लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता तसेच महात्मा गांधी रस्ता या प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हा उत्साह दिसून आला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात होती. ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर फवारणे, ‘थर्मल गन’द्वारे ग्राहकाच्या शरीराचे तापमान तपासणे हा कार्यक्रम उरकूनच ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात होता. पुस्तकविक्रीचा केंद्रबिंदू असलेल्या अप्पा बळवंत चौकातील विविध दुकाने पुस्तक खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी ओसंडून वाहिली. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने शालेय पुस्तकांच्या खरेदीला जास्त प्राधान्य होते.
चौकट
“ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’च्या समोर गेली ४५ वर्षे दुकान चालवतो. आजवर फक्त स्वत:च्या लग्नासाठी तीन दिवस आणि आईवडील गेल्यावर दोनच दिवस दुकान बंद ठेवले होते. इतक्या वर्षात पहिल्यांदाच सक्तीने दुकान बंद ठेवण्याची पाळी आली. गेल्या दोन महिन्यात दीड-एक लाखांचे नुकसान झाले. दुकानातल्या मालाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे माल विकल्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी कदाचित येऊ शकतात. पण आमच्यासमोर पर्याय नाही. आम्ही पूर्ण कोलमडलो आहोत. नेते मंडळी नियम पाळत नाहीत. आमच्यावरच सक्ती का?”
- राजेंद्र कांबळे, चप्पल विक्रेते
चौकट
“दोन महिन्यांनंतर पुस्तकांची दुकाने सुरू झाल्याने पालकांसह विद्यार्थी दहावी-बारावीची पुस्तके मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहेत. तंत्रशिक्षणावर आधारित पुस्तकांसह स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांनाही मागणी आहे. ज्ञानेश्वरीसारखे धार्मिक ग्रंथ देखील लोक खरेदी करताना दिसत आहेत. अशा पुस्तकांना मागणी आहे.”
- अक्षय, पुस्तक विक्रेते
चौकट
“ग्राहकांंचे स्वागत करण्याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे देखील पालन करायला लावायचे आहे म्हणून रांगोळीतून संदेश दिला. सकाळपासून खूप छान प्रतिसाद आहे. दीड वर्ष दिवाळी, सण ठप्प होते. दोन महिन्यांनी दुकान उघडताना ग्राहक राजाचे स्वागत पेढा देऊन केले. ग्राहकांना पण छान वाटले. आमच्यावर महापालिकेने विश्वास ठेवला आहे. तो आम्ही सार्थकी लावू.”
- गिरीश मुरूडकर, मुरूडकर झेंडेवाले
चौकट
“दोन महिन्यांनंतर पहिल्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क असे सर्व नियम पाळले जात आहेत. ‘नो मास्क-नो एन्ट्री’ हे धोरण ठेवले आहे. दोन महिन्यांत शब्दांत व्यक्त करू शकत नाही इतके नुकसान झाले आहे. आम्ही दुकानात ‘एक्स्चेंज आणि ट्रायल’ ठेवलेली नाही.
- विष्णू बिराजदार, व्यवस्थापक, कपड्यांचे दालन
चौकट
“खेळण्याचे दुकान सुरू झाल्याने लहान मुले खूष आहेत. घरात राहून त्याच-त्याच खेळण्यांना मुले कंटाळले आहेत. काहींची खेळणी मोडली आहेत. त्या मुळे नवनवीन खेळणी विकत घेण्यासाठी मुलांनी पालकांकडे तगादा लावलेला दिसतो. त्यामुळे दुकानात आल्यानंतर लहान मुले आनंदी झालेली दिसतात.”
- नीलेश पोरवाल, सायकल विक्रेते