अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर आदी गावांत बुधवार घरगुती गॅस सिलेंडर वितरण करणारी गाडी आली होती. परंतु गॅस डिलरने आॅनलाईन बुकींग केले तरच भरलेले गॅस टाकी देणार असल्याचा अडेलतट्टूपणा केल्याने अनेकांना भरलेल्या सिलेंडर घेण्यास मुकावे लागले. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला. आंबेगाव तालुक्यातील एच.पी.गॅसधारकासाठी कळंब येथे साक्षी गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्यावतीने तालुक्याच्या पुर्व भागातील दहा ते बारा गांवांमध्ये एचपी गॅस पुरवठा केला जातो.गॅस डिलर्सच्यावतीने ठरवुन दिलेल्या दिवशी गावात गॅस टाकीने भरलेला टेम्पो घेवुन जातात. बुधवारी अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक,निरगुडसर गावांचा वार असल्याने येथील गॅसधारकांनी सकाळी ९ वाजता रिकाम्या टाक्या ठरलेल्या ठिकाणी जमा केल्या. परंतु सकाळी ९ वाजल्यापासुन ते दुपारी दोन वाजेपर्यत अवसरी बुद्रुक गावात एच.पी.गॅसची गाडी न आल्याने गॅस धारकांना उपाशी पोटी गाडीची वाट पाहावी लागली. दुपारी अडीच वाजता एच.पी. गॅसची गाडी आल्यानंतर मोबाईलवर आॅनलाईन बुकींग केले. तर तुम्हाला भरलेली गॅसची टाकी मिळेल. अन्यथा रिकाम्या टाक्या परत घेवुन, जा असा सल्ला देण्यात आला. अनेक गॅसधारक ज्येष्ठ नागरिक असल्याने त्या ग्राहकांना मोबाईलवरून आॅनलाईन बुकींग करता न आल्याने अनेक ग्राहकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना रिकाम्या गॅसच्या टाक्या परत नेल्याने घरातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.मोबाइल बुकिंग करण्यात अडचणीग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना किंवा महिलांना मोबाईलवरुन आॅनलाईन बुकींग करता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना आॅनलाईन बुकींग न करता भरलेली गॅस टाकी देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच गॅस एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करावी. अशी मागणी आंबेगाव तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कल्याण हिंंगे पाटील यांनी केली आहे.
गॅस सिलिंडरची टाकी येऊनही ग्राहक उपेक्षित; महिलांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:57 AM