पुणे : महावितरणकडून शिवाजीनगरच्या जम्बो कोविड रुग्णालयाची वीज थकबाकीचे कारण पुढे करीत कापण्यात आल्यानंतर महापालिकेनेही महावितरणकडे असलेल्या थकबाकीवरून पाच ठिकाणचे पाण्याचे कनेक्शन तोडले. दोन्ही यंत्रणांकडून ‘कनेक्शन’ कापाकापीचे युद्ध रंगल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. जम्बोची वीज तोडल्यावरून टीका सुरू झाल्यानंतर महावितरणने पुन्हा हा वीज पुरवठा सुरळीत केला.
शिवजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरची वीज महावितरणकडून कापण्यात आली. याठिकाणी असलेल्या एका एजन्सीकडे ही थकबाकी आहे. या थकबाकीपोटी रक्कम न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले. हे कोविड सेंटर येत्या काही दिवसात सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. दिल्ली आयआयटीकडून प्रमाणपत्रही घेण्यात आलेले आहे. पालिका 200 ऑक्सिजन बेड सुरु करणार आहे. शहरातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी सुरू असतानाच वीज तोडण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. पालिका प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता वीज तोडण्यात आली.
यानंतर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महावितरणची थकबाकी असलेल्या ठिकाणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पाण्याची थकबाकी असलेल्या महावितरणच्या कार्यालयांचे पाणी तोडण्यात आले. यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयाची 15 लाख 38 हजार, आनंद निकेतम कोथरुड 2 लाख 34 हजार, सोमेश्वर वार्ड 1 लाख 81 हजार , वारजे 1 लाख 72 हजार, औंध येथील1 लाख 31 हजार अशी थकबाकी आहे. येथील नळजोड तोडण्यात आल्याने संध्याकाळी महावितरणकडून जम्बोमधील वीज कनेक्शन पुन्हा जोडले. तसेच त्याबाबत खुलासाही पाठविला.
-------
सीओईपी परिसरात दिपाली डिझाईनर यांचे कार्यालय आहे. सहा लाखांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र महापालिकेशी संबंधित कोविड कंट्रोल रुमचे कंत्राट दीपाली डिझाईनर यांना देण्यात आले आहे, पालिकेकडून कळविताच त्यांचा वीज पुरवठा तत्काळ जोडून दिला आहे.
- महावितरण, पुणे
--------
महापालिकेकडून पाणीपट्टीची थकबाकी असलेल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात कारवाईच्या धास्तीने दोन कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. महावितरणकडेही थकबाकी असून त्याअनुषंगाने शुक्रवारी पाच ठिकाणी कारवाई केली.
- अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग