डोर्लेवाडी : जिरायती भागाबरोबरच बागायती भागातदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या ४ गावांच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात येणार आहे. टंचाईमुळे चारही गावांतील ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा समितीने केले आहे. झारगडवाडी (बारामती) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मेखळी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी या ४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. वीर धरणात असलेल्या अत्यल्प पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चारही गावांतील पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून ५ मार्चपासून प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती समितीचे सचिव संजय म्हेत्रे यांनी दिली. या वेळी सोनगावचे सरपंच विकास माने, ग्रामविकास अधिकारी भास्कर शेंडे, मेखळीचे ग्रामविकास अधिकारी सुनील माने, झारगडवाडीचे ग्रामविकास अधिकारी कैलास कारंडे, डोर्लेवाडीचे सदस्य शंभू भोपळे, निवृत्ती नेवसे, सचिन निलाखे आदी उपस्थित होते.
चार गावांच्या पाण्यात कपात
By admin | Published: March 03, 2016 1:35 AM