धायरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने दिवसरात्र अक्षरश : कंबर कसली आहे. पुण्यात सकाळी ११ च्या नंतर कडक संचारबंदी सुरु असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर जोरदार कारवाई देखील सुरु आहे. मात्र, याचवेळी "विरोधी पक्षनेता, सोलापूर महानगरपालिका" म्हणून फलक लावलेल्या वाहनांमध्ये चौघेजण प्रवास करीत होते. मात्र,या गाडीतून उतरलेल्या एका 'महाशयां' नी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पण पोलिसांनी ''नियम सर्वांना सारखाच, त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केले आहेत म्हटल्यावर दंड भरावाच लागेल'' अशा एकदम सरळ आणि सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगितले. आणि १ हजार रुपये दंडाची पावती देखील फाडली.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीर बाजी पासलकर पुलाखालील चौकात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे व कर्मचारी नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत होते. सोमवारी( दि. १०) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास धायरीच्या दिशेकडून स्वारगेट दिशेकडे जाणाऱ्या एका कारला पोलिसांनी अडविले असता कारमधील चौघेजण दिसून आले. तसेच कारवर विरोधी पक्षनेता, सोलापूर महापालिका म्हणून लिहिले असतानाही सरकारी नियमांचे पालन राजकीय पदाधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी ''विरोधी पक्षनेता सोलापूर महापालिका'' असे लिहिलेल्या वाहनातील महाशयांना संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने १ हजार रुपये दंड भरल्याशिवाय सोडणार नाही अशी कठोर भूमिका घेतली. काहीवेळ या महाशयांनी त्यांच्याबरोबर हुज्जत देखील घातली. मात्र पोलिसांच्या कडक शिस्तीसमोर आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच महाशयांनी १ हजार दंड भरून मार्गस्थ झाले .
कोरोना विषाणू संसर्ग अनुषंगाने व सीआरपीसी कलम १४४ ची अंमलबजावणी करीत असताना काहीजण विनाकारण घराबाहेर पडून रस्त्याने फिरत असताना शासनाच्या आदेशाचे भंग केले असल्याने काही व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी हात जोडून घरी थांबण्याची विनंती केली. तरीही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी वाढतच असल्याने पोलिसांनी आता थेट विनाकारण फ़िरणाऱ्यांवर गुन्हेच दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीतील नवले पूल, वडगांव पूल, धायरी येथील उंबऱ्या गणपती चौक परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करीत आहेत, शिवाय विनामास्क फ़िरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.
सकाळी ८ ते ११ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदीदरम्यान भाजीपाला, औषधी, किराणा, दूध घेण्याच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली असता ते राहण्यास वेगळ्याच ठिकाणी असून खरेदीसाठी वेगळ्याच ठिकाणी आले असल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी करून खातरजमा करून ते खोटं बोलत असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.