पुणे : आपल्याबरोबर कॉम्प्युटर क्लासला शिकणाऱ्या ऋषिकेश माईणकर याला पळवून नेऊन त्यांचा खुन करायचा व त्यानंतर डॉक्टर असलेल्या त्याच्या वडिलांकडे खंडणी मागायची याचा ज्ञानेश्वर बोरकर याने अतिशय थंड डोक्याने कट रचला होता़ त्यासाठी त्याने शेतात आदल्या दिवशी खड्डाही खोदला होता़ अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा म्हणूनच सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती, असे या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी सांगितले़
सासणे सध्या रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत़ त्यांनी सांगितले की, ऋषिकेश माईणकर याचे अपहरण करुन खंडणी मागण्याचा कट त्याने अगोदरच रचला होता़ त्याला जर सोडले तर तो आपले नाव सांगेल याची त्याला भिती होती़ त्यामुळे अपहरण करण्याच्या अगोदरच त्याने शेतात त्याला पुरण्यासाठी खड्डा खोदुन ठेवला होता़ ऋषिकेशचे अपहरण केल्यानंतर त्याचा त्याने खुन केला़ त्यावेळी मोबाईल नव्हते़ विविध ठिकाणी पीसीओ बुथ होते़ तो डॉ़ माईणकर यांना वेगवेगळ्या बुथवरुन फोन करुन खंडणी मागत होता़ त्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी गुलाबराव पोळ तर, अपर अधीक्षकपदी प्रकाश मुत्याळ होते़ या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यासाठी तेव्हाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड व सुधीर अस्पात व मी अशी आमच्या तीन अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले होते़
आम्ही अगदी हडपसरपासून जेजुरीपर्यंतच्या सर्व एसटीडी बुथचालकांना डॉक्टरांचा घरचा व हॉस्पिटलचा नंबर देऊन या नंबरवर कोणी फोन केला तर तात्काळ आम्हाला कळवा असे सांगितले होते़ त्यानुसार जेजुरीतील एका पीसीओ वरुन ज्ञानेश्वरने फोन केल्याचे समजताच आम्ही त्याला पकडले़ सुरुवातीला तो गुन्हा कबुल करत नव्हता़ खूप चौकशी केल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास त्याने गुन्हा कबुल करुन ऋषिकेशला मारुन टाकले तो शेतातील खड्डा दाखविला़ दुसºया दिवशी सकाळी आम्ही तहसीलदार यांच्या उपस्थितीत त्या खड्डातून ऋषिकेश याचा मृतदेह बाहेर काढला़ त्याचे संपूर्ण व्हिडिओ शुटींग केले होते़ त्यामुळे सत्र व उच्च न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा युक्तीवाद मान्य करुन ज्ञानेश्वर बोरकर याला फाशीची शिक्षा दिली होती़