पुणे: सरकारी नियम लावून महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली गेली तर काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा काँग्रेस प्रणित महापालिका कामगार संघटनेने दिला आहे. संघटनेच्या रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी ही माहिती दिली.महापालिका वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी कामगार संघटना व महापालिका प्रशासन यांच्यातील चर्चेने व त्यावर सरकारची मान्यता घेऊन निश्चित करण्यात आली आहे. असे असताना आता प्रशासनाच्या वतीने काहीतरी त्रुटी काढल्या जात आहेत अशी टीका शिंदे यांनी केली. काम बंद आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन आयुक्त, महापौर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे असे शिंदे यांनी सांगितले. बैठकीला भीमराव कांबळे, दत्ता शिंदे, प्रभाकर गिरी, जयद्रथ सावंत, अप्पा भोडे, विनोद मोरे, महादेव शिंदे, नेताजी साबळे, रमेश काथवटी, टी. के. चव्हाण आदी उपस्थित होते.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 9:27 PM
महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देमहापालिका कर्मचारी :काँग्रेसप्रणित कामगार संघटनेचा इशारा