पुणे : कौन बनेगा करोडपती (केबीसी) मध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून एका जीएसटी व आयकराच्या नावाखाली ८७ हजार २०० रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला. याप्रकरणी संगमवाडी येथे राहणाऱ्या ३५ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशी करुन आरोपींची नावे निष्पन्न केली आहे. त्यावरुन संतोष कुमार, राकेश पोटन प्रसाद आणि एका मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करुन त्यांना केबीसीमध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे खोटे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने कौन बनेगा करोडपती लॉटरी न २३१ वगैरे छापलेले व २५ लाख रुपयांचे खोटे तिकीट व्हॉटसअपवर पाठविले. त्यानंतर दुसऱ्या चोरट्याने त्यांना फोन करुन लॉटरी बक्षीसाची रक्कम मिळविण्यासाठी जीएसटी व आयकर भरण्यासाठी सुरुवातीला काही पैसे भरायला सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून एकूण ८७ हजार २०० रुपये बँक खात्यावर भरायला भाग पाडले. त्यानंतरही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलीस ठाण्याने प्राथमिक चौकशी करुन आरोपींची नावे निष्पन्न करुन अधिक तपासासाठी येरवडा पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.