पुणे : लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. कंपनीच्या ग्राहकांचा डाटा चोरुन पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे तपास अधिकारी विशाल काटकर (वय ५०, रा़ बंडगार्डन) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार १५ जुलैपासून आतापर्यंत घडला आहे. कंपनीच्याच एखाद्या जुन्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सायबर चोरट्याने कंपनीतील ग्राहकांचा डाटा चोरला. त्यानंतर त्यांच्या पॉलिसीचे नुतनीकरण करायचे आहे. अशा ग्राहकांना त्यांनी कंपनीच्या नावाने बनावट ई मेल पाठविला. तसेच या पॉलिसी ग्राहकांना कंपनीच्या पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे सांगितले. कंपनी वाहन विमा, प्रॉपर्टी विमा, आगप्रतिबंधक विमा, आरोग्य विमा अशा वेगवेगळ्या पॉलिसीचे नुतनीकरण करुन दिले जातात, असे ग्राहकांना सांगत. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी त्यांना एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक व एक लिंक देऊन त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.
ग्राहकांनी पॉलिसी नुतनीकरणासाठी पैसे पाठविल्यानंतरही त्यांची पॉलिसीचे नुतनीकरण न झाल्याने त्यांनी कंपनीकडे तक्रारी केल्या. त्यानंतर कंपनीने केलेल्या तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला. ग्राहकांच्या फसवणूकीसाठी किमान ६ मोबाईलचा वापर करण्यात आला आहे. पुणे शहरातील काही जणांची तसेच देशातील इतर भागातील काही ग्राहकांची फसवणूक झाली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.