पुणे : सोशल मीडिया प्लॅटफार्मवर वेगवेगळ्या संस्थांपासून शासकीय कार्यालयांचे बनावट फोन नंबर टाकून त्यावर संपर्क करण्यांना सायबर चोरटे गंडा घालत असल्याचे आजवर अनेक प्रकरणात आढळून आले आहे. या सायबर चोरट्यांमुळे अनेक व्यावसायिकांना फटका बसला आहे. या सायबर चोरट्यांमुळे फायनान्स क्षेत्रातील नामांकित कंपनी बजाज फायनान्सलाही त्याचा फटका बसला आहे. कंपनीच्या ट्रेड मार्कसचा गैरवापर करुन कंपनीच्या नावाने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार कंपनीला आढळून आले आहे.
याप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीच्या वतीने युवराज मोरे (वय ३४, रा. विमानतळ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्टेट बँक खातेधारक व काही मोबाईलधारकांवर आयटी अॅॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. बजाज फायनान्स कंपनीचा लोगो वापरुन तसेच कंपनीच्या नावाने फेसबुक व ट्विटर या सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार केले. त्यावर नागरिकांनी संपर्क साधल्यावर त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज तसेच इन्शुरन्स पॉलिसी काढून देत असल्याचे खोटे सांगून त्यासाठी अॅडव्हास रक्कम भरण्यास सांगण्यात येत होते. नागरिकांनी पैसे भरल्यावर त्यांना कोणतेही कर्ज अथवा इन्शुरन्स न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. या प्रकारामुळे कंपनीचे नाव प्रतिमा बदनाम होत आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होत असून आर्थिक नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तपास करत आहेत.