- भाग्यश्री गिलडा
पुणे : पुण्यातील सायबर क्राईमच्या घटनांमध्ये तब्बल ५८.६७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे. शहरात १९ हजारांहून अधिक सायबर फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. सायबर पोलिस ठाण्याकडे १ हजार २९ तक्रारी आल्या असून त्यामध्ये एकूण १०८ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय चोरी, घरफोडी, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये ९.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. माहिती फसवणूक, तंत्रज्ञान कायदा, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, संगणक संबंधित गुन्हे, ओळख चोरी, फसवणूक आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील-लैंगिक कृत्यांचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करणे याअंतर्गत अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
दरवर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दाखल होणाऱ्या तक्रारींवरून लक्षात येते. पुणे सायबर पोलिस ठाण्यात दरवर्षी १९ ते २० हजार सायबर गुन्हे दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सेक्सटॉर्शन, बँक फ्रॉड, महावितरण वीजबिल फ्रॉड, लोन ॲप फ्रॉड, क्रिप्टोकरन्सी फ्रॉड, टेलिग्राम फ्रॉड अशा सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या सेक्सटॉर्शन, क्रिप्टोकरन्सी, टास्क फ्रॉड, वीजबिल फ्रॉड या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दररोज सरासरी १५ ते २० सायबर गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात येतात. या सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी निष्पन्न होण्याचे प्रमाण फक्त १० टक्क्यांएवढे आहे.
सायबर पोलिसात १ हजार २९ तक्रारी
सायबर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२३ ते १० डिसेंबर २०२३ या दरम्यान पुणे शहरात सुमारे १९ हजारांहून अधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये फक्त सायबर पोलिस ठाण्याकडे १ हजार २९ तक्रारी असून त्यामध्ये १०८ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात
भारतात विशेषत: कोविड काळात डिजिटलायझेशनचा मार्ग अवलंबविण्यात आला. यानंतर अनेक सेवासुविधा ऑनलाइन देण्यास सुरुवात झाली. मात्र याचा गैरफायदा सायबर चोरट्यांनी घेतला असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी डिसेंबर दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे, भारतातील ६८ टक्के इंटरनेट वापरकर्ते सायबर गुन्ह्यांना बळी पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकेत कमी लोकसंख्या असून इंटरनेटचा वापरदेखील कमी आहे.
चिंताजनक बाब म्हणजे, सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणांची नोंद आहे. अर्थात, सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात लोन ॲप फ्रॉड, सेक्सटॉर्शन, क्रिप्टोकरन्सी या सायबर गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
येथे नोंदवा सायबर गुन्ह्याची तक्रार
शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर पथक नेमण्यात आलेले आहे. त्यामध्ये एक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि ५ पोलिस अंमलदार यांचा समावेश असतो. जर ऑनलाइन फ्रॉड २५ लाखांच्या आत असेल तर घटना घडलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवता येते. तसेच फ्रॉड २५ लाखांपुढील असेल तर शिवाजीनगर येथे असलेल्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी लागते. तसेच crimecyber.pune@nic.in या ई-मेलवर देखील तक्रार नोंदवता येते. cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टलला देखील ऑनलाइन गुन्हा नोंदवता येतो, याशिवाय १९३० या हेल्पलाइन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवता येते.
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी हे कराच
- अनोळखी मोबाइल क्रमांकावरून आलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये.
- आपल्या बँकेचे किंवा एटीएम, क्रेडिट कार्डची माहिती कुणालाही देऊ नये.
- सहसा बँकेत वेगळा मोबाइल नंबर द्यावा. (जो फक्त बँकेच्या व्यवहारासाठीच वापरावा)
- कुठल्याही लोन ॲपवरून कर्ज घेऊ नये.
- सायबर पोलिस ठाण्यात वर्षभरात दाखल तक्रारी
कोणत्या महिन्यात किती गुन्हे?
महिना - तक्रारी अर्ज - फसवणूक रक्कम
जानेवारी - ५६ - ४,४८,६९,२०७
फेब्रुवारी - २९ - ५,०२,६६,७७०
मार्च - ४० - ५,२२,३४,०२१
एप्रिल - २६ - ४,३४,८९,८५७
मे - १०५ - १४,२८,९६,४९६
जून - ११७ - १३ ५७ २१,०७५
जुलै - ११२ - ११,८०,०६,४९१
ऑगस्ट - १२८ - ८,८७,२२,५८०
सप्टेंबर - १३८ - १२,१८,६३,२४३
ऑक्टोबर - १२२ - १३,१०,९५,४०३
नोव्हेंबर - ११० - १०,२०,३६,८९१
डिसेंबर - ४६ - ५,०३,९८,२३०