देशभरातील वाढत्या महागाईला पंतप्रधान मोदीच जबाबदार! पुण्यात काँग्रेसचा सायकल मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:36 PM2021-07-08T18:36:10+5:302021-07-08T18:46:00+5:30
पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांंनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची केली घोषणा
पुणे: देशभरातील महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत असा आरोप करत शहर काँग्रेसने गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकल मोर्चा काढला. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांंनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची घोषणा यावेळी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून गुरुवारी सकाळी मोर्चा सुरू झाला. बसवराज यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे अनेक पदाधिकारी सायकलवर सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आला.
तिथे पाटील यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांचीही भाषणे झाली. दरवाढीवर नियंत्रण ठेवून जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार राज्यातील राजकारण करण्यात गुंतले आहे, त्यांचा निषेध करावा तेवढा कमी असे ते म्हणाले. पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात सलग आठ दिवस आंदोलन करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना महागाई कमी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.