पुणे : पर्यावरणाची होणारी हानी, शेतात रासायनिक खतांच्या वापराने होणारी नासाडी, महिलांचे सक्षमीकरण, पाण्याची बचत, प्लास्टिकचा वापर टाळावा, याचा संदेश देण्यासाठी एकवीस वर्षीय तरुणी सायकलवर महाराष्ट्रभर फिरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खेडेगावातील ही तरुणी २३ जिल्हे फिरून शनिवारी पुण्यात आली. तिचे पुणेकरांनी स्वागत केले. प्रणाली विठ्ठल चिकटे असे तिचे नाव आहे. कोणाचेही पाठबळ नसताना स्वत: तिने ही सायकल यात्रा सुरू केली आहे.
सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमानवाढ, वातावरण बदल, ऋतुचक्रबदल यांतून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाऊन लोकांशी संवाद साधत आहे. पुण्यात वाचन प्रक्रिया कट्ट्याच्या मुग्धा नलावडे, टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी तिचे स्वागत केले. चार-पाच दिवस ती पुण्यातील अनेक संस्थांशी संवाद साधणार आहे.
प्रणाली म्हणाली,‘‘मी शेतकरी कुटुंबातील आहे. आतापर्यंत दहा हजार किलोमीटरचा प्रवास झाला. खूप अनुभव आले. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) गावी मी राहते. माझे बीएसडब्ल्यू झाले आहे. मी माझ्या गावातील शासकीय योजना लोकांना समजाव्यात यासाठी काम करत होते. लॉकडाऊनमध्ये पर्यावरणातील बदल वाचनात आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पर्यावरणाबाबत जागृती करण्याचा विचार मनात आला आणि लगेच सुरवात केली. शेतात सेंद्रिय पद्धतीचा वापर होेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सुद्धा ही यात्रा संपल्यावर शेतीच करणार आहे.’’
पुण्यातून नगर, मुंबई आणि मराठवाड्याकडे ती मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये घरी पोहचण्याची तिची योजना आहे.
-------------------------------------
प्रणालीचे पाच संदेश
* वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोटारगाडी टाळून, शक्य ती कामे सायकलने करू या.
2. प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवा.
3. परिसरात झाडे लावू या व जगवू या. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या.
4. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू आणि आपले आरोग्य सुधारू.
5. पाणी बचत व पाणी जिरवा या कामात सहभाग घेऊ या.