पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजाॅय चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती रोखली गेली आहे. पुढील चार दिवसांत मान्सूनमध्ये फारशी प्रगती होण्याची शक्यता नसल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा पालख्या पावसाशिवाय मार्गक्रमण करत आहे.
नैऋत्य मान्सूनने कर्नाटक व कोकणाच्या काही भागात प्रवेश केल्याचे दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने जाहीर केले. कोकणात काही ठिकाणीच पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
पुणे शहर व परिसरात पुढील चार दिवसात काही ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता दुरावलेली दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून १८ ते २२ जूनच्या दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता असून त्यानंतर त्याची राज्यातील इतर भागात वाटचाल सुरू राहण्याची शक्यता आहे.