पुणे : 'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने आपल्या विभागातून सुरू होणाऱ्या २७ रेल्वे रद्द केल्या. यात २० हजार ७०० प्रवाशांनी आपले आरक्षित तिकीट काढले होते.मात्र रेल्वेच रद्द झाल्याने त्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने तिकीटाची पूर्ण रक्कम परत केली आहे. तिकिटा पोटी घेण्यात आलेली १ कोटी ७० लाख रुपये प्रवाशांना परतावाच्या रुपात दिले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
१६ ते २१ मे दरम्यान पश्चिम रेल्वे वरून धावणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे. पश्चिम रेल्वे व अन्य विभागाचे मिळून एकूण ५४ रेल्वे रद्द तर ५ रेल्वे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले.
वादळात ही 'ऑक्सिजन एक्सप्रेस' सुसाट.....
तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात मध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली. मात्र, या विपरीत परिस्थितीत देखील पश्चिम रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही. मंगळवारी राजकोट विभागाच्या कानासुल येथून दिल्लीसाठी ऑक्सिजनचे पाच टँकर मार्गस्थ झाले. तसेच आंध्र प्रदेश येथील गुंटूर साठी देखील चार टँकर रवाना झाले. आता पर्यंत पश्चिम रेल्वेने 36 टँकर वेगवेगळ्या राज्यात पाठवले आहे.यातून 3253.43 मेट्रिक टन इतकी वाहतूक झाली.