बारामती : बारामती तालुक्यातील मळद येथे पुरामुळे दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीमध्ये एका युवकाने उडी घेतल्याचा प्रकार दुपारी घडला. स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालुन या युवकाला मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले.या युवकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारपासून कऱ्हा नदीला आलेला पुर पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील पुलांवर गर्दी होत आहे.यामध्ये पुराचे छायाचित्र,सेल्फी काढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोलिसांना इतर बचाव कार्य करण्यापेक्षा पुलावर धोकादायक पध्दतीने फोटो काढणाऱ्यांसह सेल्फी घेणाऱ्यांना आवरताना दमछाक झाली.खंडोबानगर येथे नदीच्या पुलावर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी अशीच हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला पोलिसी हिसका दाखविला.त्यानंतर पुलावरील हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांनी पोलिसांची धास्ती घेवुन काढता पाय घेतला.मात्र, ग्रामीण भागात हुल्लडबाजी सुरुच होते.मळद येथील नदीच्या पुलावरुन ३० वर्षीय विनोद रणधीर युवकाने गुरुवारी(दि २६) दुपारी नदीच्या पुरामध्ये उडी घेतली.यावेळी पुलाच्या दोन्ही बाजुला मोठा पोलीस बंदोबस्त होता.मात्र, मध्यभागी पोलीस नसल्याचे पाहुन विनोद थेट पात्रातील पुरात झेपावला. यावेळी पोलिसांसह उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.यावेळी उपस्थित असणाऱ्या युवकांनी मात्र, त्याला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली. सतर्कता बाळगत तातडीने विनोदला बाहेर काढले.यावेळी विनोदवाहत जावुन अवघ्या १५० फुट असणाऱ्या स्मशानभुमीपर्यंत पोहचला होता,तोच पाठीमागुन पुरात उड्या घेतलेल्या मुलांनी त्याला गाठले.त्यानंतर त्यालाबाहेर काढण्यात आले.
मनोज शिंदे,सुजीत गजरमल,रोहन लोंढे,अनिकेत भोसले,बंटी खोमणे,महेश साबळे,अमर माने आदी युवकांनी धाडस केल्याने विनोदचा जीव बचावला. विनोद याला चांगले पोहता येते.मात्र, तो सनकी असुन आज मद्याच्या अंमलाखाली त्याने पुरात उडी घेतल्याची याठिकाणी चर्चा होती. नदीच्या पुरातुन विनोद यास बाहेर काढल्यानंतर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.————————————— ...मला देवाला जायचे आहे,पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विनोद पुरता घाबरला.त्याने कारवाई होवु नये, यासाठी गयावया करण्याचा प्रयत्न केला. मला माफ करा,मला मारु नका. मला देवाला जायचे आहे,देवाच्या पाया पडायचे आहे,अशी विनवणी तो पोलिसांना करत होता.यावेळी पोलिसांनी त्याला तुला कोणी मारत नाही, तू फक्त बरोबर चल,असे सांगुन समजुत घालत बरोबर नेले.