सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार
By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: May 28, 2023 14:04 IST2023-05-28T14:04:11+5:302023-05-28T14:04:28+5:30
एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका

सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार
पुणे : पुण्यात सिलेंडर ११०६ वर गेलाय. पेट्राेल लिटरला १०६ रूपये माेजावे लागतात. अर्थव्यवस्था ढासळली आहे. गेल्या नउ वर्षांत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट तर साेडाच आत्महत्या जास्त झाल्या आहेत. सांप्रदायिक दंगे हाेत आहेत. एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’ अशी टीका करत येत्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाचे सरकार येईल, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या नेत्या आणि प्रवक्ता विंग कमांडर अनुमा आचार्य यांनी व्यक्त केला.
आचार्य, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस भवन येथे आयोजित 'नऊ वर्षे ,नऊ प्रश्न' या पुस्तकाच्या प्रकाश समारंभात त्या बोलत होत्या. गेले नऊ वर्षे मोदी सरकारच्या काळातील निर्माण झालेल्या प्रश्नावर काॅंग्रेस पक्षाकडून 'नऊ वर्षे ,नऊ प्रश्न' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नउ वर्षांतील नउ प्रश्न उपस्थित करून त्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी शहर काॅंग्रेसचे पदाधिकारी अभय छाजेड, उल्हासदादा पवार, कमलताई व्यवहारे आदी उपस्थित हाेते.
या सरकारने माहीती लपवली जात असल्याचा आराेप त्यांनी केला. जागतिक आराेग्य संघटनेने देशात काेराेना काळात ४८ लाख लाेक मेल्याचे सांगितले. परंतू माेदी सरकार केवळ पाच लाख म्हणते. चीनने भारतीय जमीनीवर अतिक्रमण केले आहे. आतापर्यंत ज्या सरकारी यंत्रणांची कारवाई झाली त्यामध्ये ९५ टक्के विराेधक आहेत. तर त्यांच्याकडे जाणा-यांना वाॅशिंग मशीनमधून धुवून घेतले जाते.