कात्रज : घरगुती सिंलेडर व्यावसायिक सिंलेडरमध्ये भरून चढ्या दराने बाजारात विक्री करण्याच्या अड्ड्यावर ते भरत असताना शुक्रवारी रात्री ११.३० च्या भीषण स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी ( दि.७) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या स्फोटात तीन जण जखमी झाले असुन एकाची प्रकृती गंभीर आहे.या स्फोटाच्या आवाजाने दोन किलोमीटर परिसर हादरला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून सुरु राजू विष्णोई यांचा अप्पर,इंदिरा नगर भाड्याच्या घरामध्ये घरगुती सिंलेडर व्यावसायिक सिंलेडरमध्ये भरून चढ्या दराने बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय मागील अनेक दिवसापासुन सुरु केला होता.रात्री राजू विष्णोई हेच काम करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये अपघातामध्ये राजू विष्णोई गंभीर जखमी झाले असुन इतर दोन नागरिक झखमी झाले आहे. सुदैवाने कुटलीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी या घटनास्थळावरून ३१ गॅसचे सिलेंडर जप्त केले आहेत.तसेच.बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की,आरोपीसह जागा मालक व गॅस एजन्सीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बिबवेवाडी भागामधील सर्व गोडाऊन व संशयित घरांची पाहणी करून हे प्रकार बंद होतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
या स्फोटात शर्मिला खोमणे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असुन त्यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले की, याची तक्रार आम्ही येथील स्थानिक लोकप्रतिनिधीकडे केली होती. मात्र याची दखल घेतली गेली नसल्याने हा प्रकार घडला.या स्फोटामध्ये मला व माझ्या पतीला देखील दुखापत झाली आहे.आमचे घर कधीही पडु शकते. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला येथे राहू नका असे सांगितले आहे.मात्र आम्ही आता कुठे जायचे हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे.
अप्पर मध्ये मागील तीन महिन्यात ही दुसरी घटना घडलेली आहे.अशाप्रकारे अवैधपणे सिलेडरचे गोडाऊन किंवा घरात ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.बिबवेवाडीतील अनेक गोडाऊनमध्ये असे विनापरवाना सिंलेडर पाहायला मिळत आहेत.- रुपाली धाडवे , नगरसेविका