पुणे - अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना ससून रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंगळवारी सकाळी तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. ससूनमध्ये आठ डॉक्टरांच्या पथकाने डीएसकेंची तपासणी केली. यानंतर त्यांना ससून रुगणालयातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 48 तासानंतर पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला जाणार आहे. रिपोर्ट सामान्य आले असते तर डीएसकेंची पुन्हा कोठडीत रवानगी झाली असती.
डी एस कुलकर्णी यांची मेडिकल टेस्ट आज ससून रुग्णालयात घेण्यात आली. तिचा रिपोर्ट बंद लिफाफ्यात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पोलिसांच्या वतीने हा रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. डी एस के यांच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रविवारपेक्षा सोमवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांच्या मेडिकल टीमने त्यांची तपासणी केली. डी. एस के यांना आणखी 2 दिवस ससून रुग्णालयात ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्याची पुन्हा तपासणी करून तसा रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालय पुढील निर्णय घेईल.
उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी पुण्यात न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीच्या दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डी. एस. कुलकर्णी यांनी त्यांच्या 7 प्रमुख भागीदार संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या आहेत. त्यातील मोठा भाग हा त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वळविला आहे. त्यानंतर त्या खात्यातून तो डी. एस. कुलकर्णी, त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी व इतरांच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आल्याचे सांगितले.
उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन काढून घेतला. असा निर्णय होणार असल्याची जाणीव असा असल्याने डीएसके अगोदरच पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) चार पथके मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणी रवाना केली होती. डीएसके यांच्या मोबाइलवरील कॉल रेकॉर्डवरुन ते दिल्लीत असल्याचे पोलिसांना समजले. सायबर क्राईमचे दोन अधिकारी व कर्मचारी हे अगोदरच दिल्लीला होते. दिल्लीतील वसंत कुंज भागातील डीएमसी क्लबमध्ये शनिवारी पहाटे दोघांना ताब्यात घेण्यात आले. विमानाने त्याना सायंकाळी पुण्यात आणले. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्या नंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या समोर हजर केले गेले.
डी एस कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली.
डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या व्यवहारांचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती़ त्यांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार डीएसकेंनी नावात छोटे बदल करून एकूण ५९ कंपन्या स्थापन केल्या व त्याद्वारे लोकांकडून ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. याशिवाय त्यांनी अनेकांकडून सुमारे ३५ कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जदेखील घेतली आहेत. ठेवी व असुरक्षित कर्जे मिळून एकूण १ हजार १५३ कोटी रुपये त्यांनी स्वीकारले आहेत.
याशिवाय विविध बँकांची २ हजार ८९२ कोटींची कर्जे आहेत. याशिवाय ज्या लोकांनी फ्लॅट बुक केले त्यांनी भरलेले पैसे व घेतलेली कर्जे यांची रक्कम वेगळी आहे. न्यायालयाने डी एस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनाही चौकशीसाठी पोलिसांकडे ४ दिवस हजेरी देण्यास सांगितले आहे. त्यांनीही पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २२ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे.