पुणे : शहराच्या कोणत्याही भागात डबे पोहोचविणारे 'डबेवाले' सर्वांना परिचित आहेत. पण असाही एक समाजभान जपणारा 'डबेवाला कोरोना योद्धा' आहे. जो एसटीमधील कोणताही कर्मचारी असो किंवा एखादा गरजवंत अथवा ज्यांची जेवणाची सोय नाही अशांसाठी सदैव तत्पर असतो. अत्यावश्यक सेवेतील कुणीही असो किंवा कुणी पांथस्थ त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं काम हा 'योद्धा' करीत आहे. या योद्ध्याला अन्नदानाचं जणू वेडचं लागलं आहे. या' डबेवाला कोरोना योद्ध्याचं ' नाव आहे राजेंद्र नागटिळक. एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगारात ते चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या विधायक कार्यात त्यांची पत्नी सुरेखा नागटिळक देखील खंबीरपणे साथ देत आहे. त्या केबीपी महाविद्यालय येथे अध्यापनाचे काम करतात. 'कोरोना संसर्गावर विजय मिळविण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, एसटीचे कर्मचारी हे 'कोरोना वॉरियर्स' अहोरात्र झटत आहेत . अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला आहे. मात्र या लढाईत या दांपत्यानेही खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत 'लॉकडाऊन' असल्याने अत्यावश्यक सेवेतील मंडळीना देखील विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे . हॉटेल बंद असल्याने वेळेवर जेवण देखील मिळत नाही.ही बाब राजेंद्र नागटिळक यांच्या लक्षात आली अन सोबतीच्या विविध चालक वाहक वा अन्य अत्यावश्यक सेवेतील मंडळीना चक्क ते आपल्या घरातूनच डबे घेऊन जाऊ लागले . पनवेलवरून एसटी घेऊन आल्यामुळे राजेंद्र नागटिळक हे सध्या चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत. या अनोख्या प्रवासाविषयी सुरेखा नागटिळक 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या,खरंतर रस्त्यावर फिरल्यानंतर लोकांचे खरे प्रश्न कळतात. एसटी चालवताना रस्त्यावर लहान मुलांच्या पायात चपला नाहीत हे पाहिल्यानंतर त्यांचं काळीज कळवळायचं. माझ्याजवळ त्यांना द्यायला काहीच नव्हतं असं ते म्हणाले आणि मलाही वाईट वाटलं. मग काय करता येईल असा विचार करू लागलो.बिस्किट किंवा दोन डझन केळी ठेवा म्हटलं तर ज्येष्ठांना खाता येणं शक्य नाही. मग मी ज्वारीमध्ये तांदूळाचे पीठ घालून त्यांच्याबरोबर दहा भाक-या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा देण्यास सुरूवात केली. दिवसभर ती भाकरी त्या व्यक्तीला खाता आली पाहिजे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला. आज लोक त्यांची गाडी ओळखायला लागली आहेत. या कामातून आम्हाला खूप समाधान मिळत आहे. आम्ही अन्न घेऊन येतो म्हणून माणसं येतात की माणसं येतात म्हणून आम्ही अन्न घेऊन जातो हेचं कळत नाही. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेच्या वेळेला जावं लागायचं. साहेब त्यांचा डबा चालकांना द्यायचे त्यामुळे त्यांच्याजवळच्या भाक-या साहेब लोकांना उपयोगी पडल्या.पनवेल ड्युटी लागली तेव्हा खूप माणसं दिसतील तेव्हा केळी आणि बिस्कीटं ठेवा असं सांगितलं. लोकांना
आपल्या परीने मदत करण्यासाठी खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. अनेक वर्षांपासून आमचा हा उपक्रम सुरू आहे. सध्या पनवेलवरून आल्यामुळे चौदा दिवसांसाठी ते होम क्वारंटाईन झाले असले तरीही कुणाला डबे पोहोचवायचे आहेत का? म्हणून मित्रांना फोन करत असतात. सतत अन्नदानाचे विचारच त्यांच्या मनात चालू असतात.