पुणे: एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय दाखवत लॉकडाऊन सुरू असताना पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढण्यात आली. या संबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रस्त्यावर पुणेकरांना पकडणारे पोलीस उशिरा जागे झाले असून तब्बल २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करीत काही आरोपींना अटक केली आहे. याच वाघाटेच्या अंत्ययात्रेत आता कोरोना नियमांना पायदळी तुडवली असल्याचे समोर आले आहे. या अंतयात्रेचा एक व्हिडीओ समोर आला असून मोठ्या संख्येने या तडीपार गुंडाचे समर्थक अंत्ययात्रेत जमा झाले असल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर या गुंडाच्या समर्थकांनी अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यात अनेक जण मास्क न लावताच सहभागी झाले होते.
पुण्यात सध्या चौकाचौकात नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्यास त्यांच्यावर कारवाई आहे. तर दुसरीकडे अशी घटना घडल्याचे हद्दीतील पोलिसांना कसे समजत नाही हाच सवाल उपस्थित होत आहे. काल दुपारी १ वाजल्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यावर अखेर रात्री ८ वाजता भारती विद्यापीठ पोलिसांनी २०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.