पुणे : अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळायलाच हवेत अशी तंबी कृषी मंत्री दादा भूसे यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत राज्यात काम करणाऱ्या ६ कंपन्यांच्या प्रतिनिधींना मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली. राज्यात ३४ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून त्यातील फक्त १० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आतापर्यंत पुर्ण झाले आहेत.
मंगळवारी रात्री उशीरापर्यंत झालेल्या या बैठकीत कृषी मंत्री भूसे तसेच कृषी सचिव एकनाथ डवले ऑनलाईन सहभागी झाले होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, सांख्यिकी विभागप्रमुख विनयकुमार आवटे तसेच राज्यात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. जूलै ते सप्टेबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेत राज्यातील ८४ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३३ लाख ५२ हजार जणांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडे दावा दाखल केला आहे. त्यातील १० लाख जणांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे झाले आहेत.
मंत्री भूसे यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर विमा कंपन्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने ९७३ कोटी रूपये हप्ता दिला. केंद्र सरकारने ८९३ कोटी रूपये जमा केले. शेतकऱ्यांचेही २ टक्के प्रमाणे काही कोटी रूपये जमा झालेत. असे असताना कंपन्यांकडून किरकोळ कारणे, जूजबू कागदपत्रे यावरून शेतकऱ्यांचे दावे नाकारले जातात. ते काही फसवायचे म्हणून दावा दाखल करत नाहीत तर नुकसान झाले म्हणून करतात. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीने पहा व दावे मंजूर करा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे पहा, त्यासाठी कर्मचारी वाढवावे लागतील तर वाढवा असे मंत्री भूसे यांनी बैठकीत उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले.
आयुक्त धीरजकूमार यांनी राज्याची माहिती दिली. आवटे यांनी जिल्हानिहाय आकडेवारी सादर केली. ३४ लाख ५२ हजार पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून १० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. पंचनामे होताना महसूल, कृषी तसेच विमा कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित असणे गरजेचे असते. तांत्रिक बाबीत अडकून पडू नये, आपत्तीक्षेत्र मोठे असेल तर सामूहिक पंचनामे करून दावा प्रकरणे तयार करावीत अशी सूचना मंत्री भूसे यांनी केली.