Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:22 IST2024-08-16T17:21:16+5:302024-08-16T17:22:40+5:30
अजित पवारांनी थांब तुला थोड्या वेळाने बोलतो, असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला

Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राज्यातून जनसन्मान यात्रा सुरु आहे. कालपासून ही यात्रा पुण्यात दाखल झाली आहे. आज ती मावळात पोहोचल्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. य सभेत अजित पवारांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्याने त्यांना विनवणी केल्याचे समोर आले आहे. 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याने भर सभेत अजितदादांकडे विनंती केली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभेला अजित पवारांना मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीची फक्त एकच जागा निवडून आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता गोंधळाचे वातावरण निर्मण झाले आहे. त्यांनी पक्ष फुटीनंतर अजितदादांना साथ दिली. आता मात्र ते पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या वाटेवर आहेत. मध्यंतरी अजित दादांचे आमदार पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच रोहित पवारांनी अजित पवार गटातील कार्यकर्ते आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी अजित पवारांनी असं काहीच नसल्याचे स्पष्ट केले. आणि या चर्चेला पूर्णविराम दिला. परंतु आज पुन्हा या कार्यकर्त्याच्या विनवणीने अनेक कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती#Pune#AjitPawar#NCP#mavalpic.twitter.com/tLZEFisLCl
— Lokmat (@lokmat) August 16, 2024
शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी पुन्हा एकत्र यावं
अजित पवार यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याने ‘अजित दादा’ पुन्हा आपल्या पक्षात या, अशी मोठ्याने हाक मारली. तो कार्यकर्ता अजित दादा, अजित दादा असे तळमळीने ओरडत होता. त्यावेळी अजित पवारांनी थांब तुला थोड्या वेळाने बोलतो, असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरुण थांबत नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या तरुणाच्या हातातील अजित दादा राष्ट्रवादीत पक्षात पुन्हा या असा उल्लेख असलेलं फ्लेक्स काढून घेतला. विक्रम बोडके असं या तरुणाचं नाव आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा या तरुणाने व्यक्त केली आहे.