---
शिरूर :मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित
तालुका शिरूर या संस्थेचे सदस्य
भाजपा तालुकाध्यक्ष दादा पाटील-फराटे व शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांसह चार सदस्य सहकारी संस्थांचे थकबाकीदार असल्याने निवडणूक लढविण्यास पुढील पाच वर्षाकरिता अपात्र ठरवण्यात आले असल्याचा निकाल विभागीय सहनिबंधक पुणे संगीता डोंगरे यांनी ४ मार्च रोजी दिला असल्याची माहिती याचिकाकर्ते महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेस सागर फराटे, समीर फराटे उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना याचिकाकर्ते राजाराम शितोळे म्हणाले की, मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित या संस्थेचे सदस्य असलेले दादासाहेब गणपत फराटे, सुधीर बाळासाहेब फराटे, शहाजी राजाराम फराटे, तुकाराम जयवंत थोरात हे सदस्य अनुक्रमे शरद सहकारी बँक शिरूर, कल्याण जनता सहकारी बँक चिंचवड, मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मांडवगण फराटा या संस्थेचे थकबाकीदार असल्याने यांचे संचालक पद रद्द करावे अशी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था शिरूर येथे केली होती. परंतु शिरूर येथील सहाय्यक निबंधक यांनी निर्णय दादा पाटील फराटे व सुधीर फराटे व इतर दोघांच्या बाजूने निकाल दिला होता. हा निर्णय मान्य नसल्याने ८मे २०१८ महादेव फराटे वर राजाराम शितोळे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे अपील केले होते. त्यासाठी सर्व कागदपत्रे देण्यात आली होती.
या अपील व सुनावणीच्या वेळेस प्रतिवादी यांना उपस्थित राहून, म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देऊनही ते सदर प्रकरणी उपस्थित राहिलेले नाहीत यावरून त्यांना ते थकबाकीदार असल्याचे मान्य असल्याचे दिसून येत आहे.
या अपिलावर दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ अंतिम सुनावणी होऊन दिनांक ४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशित दिनांकापासून समितीच्या पुढील पाच वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास, पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास, किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही. असा निर्णय विभागीय सहनिबंधक पुणे संगीता डोंगरे यांनी दिला आहे असे यावेळी याचिकाकर्ते महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
--
चौकट
उच्च न्यायालयात दाद मागणार : फराटे
या निर्णयाबाबत बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख तथा मांडवगण फराटा कार्यकारी सोसायटीचे सदस्य सुधीर फराटे म्हणाले की, शिरूरचे सहायक निबंधक यांनी आमच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु विभागीय सहनिबंधक पुणे यांच्याकडे अपील झाल्यानंतर, आम्हाला कुठलीही नोटीस वगैरे देण्यात आली नाही एकतर्फी निर्णय देण्यात आला असून, या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.
या निकालाबाबत कुठलीही माहिती नसल्याने याचा निकाल पाहून त्या नंतर बोलणार असल्याचे
भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष व संस्थचे सदस्य
दादा पाटील फराटे यांनी सांगितले .