पुणे : शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांना जड अंतःकरणाने त्यांच्या देश विदेशातील अनुयायांनी शेवटचा निरोप दिला. वासावनी यांचे गुरुवारी (12 जुलै) सकाळी 9.01 वाजण्याच्या सुमारास अल्पशा अाजाराने निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. त्यांच्या पार्थिवावर आज (१३ जुलै) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे सुरु आहे.
तत्पूर्वी साधू वासवानी मिशनपासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत त्यांचे देश, विदेशातील अनुयायी सहभागी झाले होते. दिवसभर वासवानी मिशनमध्ये त्यांचे अंत्यदर्शन खुले ठेवण्यात आले होते.त्यावेळी भजन आणि नामस्मरण करणे सुरु होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण आडवाणी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. संपूर्ण वातावरण भावुक झाले होते. अंत्यसंस्कारांपूर्वी विविध धर्माच्या धर्मगुरूंनी त्यांना आदरांजली वाहिली.
येत्या 2 अाॅगस्ट राेजी त्यांचा शंभरावा वाढदिवस हाेता. तीन दिवसांपूर्वी दादा वासवानी यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्यानंतर त्यांना घरीही अाणले हाेते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. सदैव प्रसन्न असणाऱ्या दादा वासवानी यांनी संपूर्ण अायुष्य शाकाहारीचा प्रचार केला.त्यांनी इंग्रजीमध्ये 68, कथासंग्रह 16, हिंदीत 19, सिंधीमध्ये 5, मराठीमध्ये 7, कन्नड 5, तेलगू 3, अरेबियन 2, चायनिज 1, डच 1, बहासा 4, स्पँनिस 12, गुजरातीमध्ये 1, ओरिया 5, रशियन 1, तमिळ९ , लँटवियन 1 पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अाध्यात्मिक गुरु म्हणून अाेळखले जायचे.