"दादा गृहखातं मागतील पण मी देणार नाही..." देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर स्तुतीसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 05:11 PM2024-03-02T17:11:39+5:302024-03-02T17:12:45+5:30
बारामती येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनासह नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला....
बारामती (पुणे) :बारामतीची विकासकामे पाहून मी प्रभावित झालो आहे. दादा मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या. आता मला मोह होत आहे की, आपल्या पोलिस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावे. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. अर्थात दादा मला हळूच म्हणू शकतील की, पीएमसी कशाला खातंच माझ्याकडे द्या. पण दादांना खातं देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन, अशी मिश्किल टिपणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बारामती येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनासह नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नमो महारोजगार मेळावा हा तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम आहे. या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून पश्चिम महाराष्ट्रात बारामतीत हा मेळावा होत आहे. त्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामतीचे बसस्थानक एअरपोर्टप्रमाणे निर्माण केले आहे. तर काॅर्पोरेट कंपनीप्रमाणे पोलिस उपमुख्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. हे बांधकाम सरकारी आहे, असे वाटतच नाही. आता माझ्यामागे लोक इथे पोस्टिंग देण्यासाठी लागतील. कारण एवढं चांगल कार्यालय आणि निवासस्थान केवळ बारामतीमध्येच आहेत.
....तर आम्ही सगळे एकत्रित चांगले काम करू
मेळावा जाहीर झाल्यापासून गेले दोन-तीन दिवस माध्यमांना उद्योग लागला. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी दिली. हा मंच याचा साक्षीदार आहे. एखादं चांगल काम करायचं असेल तर राजकारण बाजूला ठेवत सर्वजण एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे नव्या पिढीला आधार देण्यासाठी आम्ही सगळे मिळून चांगले काम करू शकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महारोजगार मेळाव्याबाबत चाललेल्या वृत्तांवर भाष्य केले.
राजकारणात काम करणारे आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत. आमचे कंत्राट दर पाच वर्षांनी ‘रिनिव्ह’ होते. आम्ही चांगले काम केल्यास आमचे कंत्राट रिनिव्ह होते. अन्यथा लोक आम्हाला घरी बसवितात. मात्र, मेळाव्यात चांगले काम केल्यास कायमचा रोजगार मिळेल, जन्मभर तुमची प्रगतीच होणार आहे, अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आहे, अशी मिश्कील टिपणीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.