लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुलभा ब्रह्मे यांच्या जागेत सुरू असलेल्या लोकायत संस्थेच्या कार्यालयावरून वाद सुरू झाला आहे. हा वाद आता या जागेच्या मालकी हक्काबाबत असणारे ब्रह्मे यांचे मृत्युपत्र खरे की खोटे येथवर आला आहे.
“लोकायत संघटनेच्या जागेच्या वादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. जागेवर कोणाचाही हक्क नसल्याचे न्यायालयीन आदेशात नमूद करण्यात आले आहे. या जागेवर ज्यांना ताबा मिळवायचा आहे ते बेकायदेशीररीत्या आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. सर्वांनीच कायद्याने चालावे,” असे आवाहन लोकायत संघटनेच्या संस्थापिका अलका जोशी यांनी शनिवारी (दि.६) पत्रकार परिषदेत केले. अॅड मोनाली. च. अ., मंगल निकम, सतीश पाईकराव आदी यावेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाल्या की, डॉ. सुलभा ब्रह्मे यांच्या मृत्यूनंतर अद्वैत पेडणेकर, अमित नारकर हे दोघे सुलभा ब्रह्मे यांच्या मृत्युपत्रात आम्ही वारस असल्याचा दावा करत आहेत. परंतु ब्रह्मे यांचे मृत्युपत्र खरे असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे जागेचा मालक कोण हे अजूनही वादग्रस्त आहे. त्या जिवंत असताना २००४ साली ही जागा ‘लोकायत’ला देण्यात आली.
त्यानंतर आता २ फेब्रुवारीला सदर जागेचा कुठलाही कायदेशीर अधिकार जवळ नसताना अमित नारकर आणि अद्वैत पेडणेकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि गुंडांना बरोबर घेऊन बेकायदेशीररीत्या जागेत घुसले. आमच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातून कोणताही आदेश नसताना हे सर्व काही घडले. पुन्हा ४ तारखेला या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी डेक्कन पोलीस स्टेशनला धाव घेतली. स्टेशनमध्ये सहा तास थांबूनही आमचा एफआयआर नोंदवला गेला नाही. त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. उलट आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर आणि किरण मोघे सदर जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. या राजकीय पक्षाच्या दबावामुळे हे वारंवार घडत आहे, असा आरोप अलका जोशी यांनी केला आहे.