लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लायन्स् क्लब पुणेतर्फे आयोजित सागर ढोमसे स्मृतिप्रीत्यर्थ ‘लायन्स् करंडक’ प्रौढ (४० वर्षांवरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत सौरभ रवालिया याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दादाज् इलेव्हन संघाने कॉसमॉस कल्ट् संघाचा ४ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत कॉसमॉस कल्ट् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. यात सचिन जयवंत याने ६१ चेंडूत ११ चौकार व १ षटकारासह नाबाद ८७ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. दादाज् संघाच्या मनोज मराठे याने ३७ धावात २ गडी बाद केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना सौरभ रवालिया (५९ धावा) आणि गणेश कुदळे (२२ धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५२ चेंडूत ६५ धावांची भागिदारी करून विजयाचा पाया रचला. याच्यानंतर सतीश सावंतने नाबाद २३ धावा करून संघाचा विजय निश्चित केला. दादाज् इलेव्हनने हे आव्हान १९.२ षटकांत व ६ गडी गमावून पूर्ण केले. अष्टपैलू खेळी करणाऱ्या सौरभ रवालिया याला सामनावीर हा किताब देण्यात आला.