पुण्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील आदरस्थान डॉ. शां. ब. मुजुमदार शनिवारी (दि.३१) वयाच्या ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने त्यांची कन्या आणि सिम्बायोसिस सोसायटीच्या मुख्य संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ‘लोकमत’च्या वाचकांसाठी व्यक्त केलेल्या भावना...
--------------
स्वभावातील साधेपणा आणि नम्रता ही दादांची स्वभाववैशिष्ट्ये. वागण्यात बडेजाव असू नये, हे सूत्र त्यांनी स्वत: पाळले आणि आमच्यातही रुजवले आहे. प्रचंड वाचन, प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घेण्याची सवय, अभ्यासू वृत्ती आणि ध्येयाप्रती अपार निष्ठा या गुणांमुळे डॉ. शां. ब. मुजूमदार सर आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. संस्कृती, शिक्षण आणि आरोग्य यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. नातवंडे, पतवंडे यांच्याबरोबरचा वेळ माझ्या आयुष्यातील आनंदाचा काळ आहे, असे दादा नेहमी म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या ‘मी आणि सिम्बायोसिस’ या पुस्तकाचे नातवंडे आणि पतवंडाच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असून ते आम्हा सर्वांच्या आयुष्यातील दीपस्तंभ ठरले आहेत.
सिम्बायोसिसची १९७१ साली स्थापना झाली. सुरुवातीला शिक्षणासाठी येणारे परदेशी विद्यार्थी आमच्या घरीच राहायला असत. त्यामुळे संस्थेचा विद्यार्थ्यांना फायदा झालाच; मात्र, आमच्यावरही सर्वधर्मसमभाव, सांस्कृतिक एकोपा यांचे संस्कार झाले. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही उक्ती दादांमुळे प्रत्यक्ष अनुभवता आली. स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी कुटुंबाला वेळ दिला. कोरोना काळात आई-दादा लवळेमध्ये राहायला आल्यानंतर त्यांच्या जीवनशैलीत बराच फरक पडला आहे. पूर्वी ते वाचन करत, कामे करत रात्री उशिरापर्यंत जागायचे, त्यामुळे सकाळी उठायला उशीर व्हायचा. आता ते सकाळी लवकर उठतात, चालायला जातात, व्यायाम करतात. त्यांचे वाचन प्रचंड आहे. आजही प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची तयारी असते. सिम्बायोसिसच्या प्रत्येक इमारतीतील स्वच्छतेवर त्यांचा जास्त भर असतो.
मुजुमदार सरांनी विकेंद्रीकरणावर कायम भर दिला आहे. विविध जबाबदा-यांवर नेमलेल्या व्यक्तींना कामाचे स्वातंत्र्य, स्वायत्तता मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्तींना अधिकार दिले तरच त्यांना संस्था आपली वाटते, हा त्यांचा विचार आहे. २५:५०:२५ या फॉर्म्युल्यानुसार, २५ टक्के रक्कम पगारावर, ५० टक्के शिक्षणावर आणि २५ टक्के रक्कम भविष्यातील कामांसाठी सुरक्षित रहावी, हे गणित सरांनी कायम पाळले आहे. कोरोना काळात अनेक संस्थांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले, पदोन्नती रोखली. सिम्बायोसिसने कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले नाहीत, प्रलंबित पदोन्नतीही दिल्या. संस्थेतून चांगले विद्यार्थी आणि पर्यायाने चांगली माणसे घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. त्यातील ८ निकषांनुसार, सिम्बायोसिसमध्ये ८ समित्या नेमून सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्याचा दस्तावेज तयार करण्यात आला आहे. ‘सिम्बायोसिस व्हिजन २०२५’ हा दस्तावेज सरांना सादर केला जाणार आहे. शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाचा १० २ हा फॉर्म्युला ५ ३ ४ असा करण्यात आला आहे. या समीकरणावर आधारित शाळा सिम्बायोसितर्फे सुरू केली जाणार असून, या पद्धतीची ही भारतातील पहिली शाळा असेल.