पुणे : तीन आठवड्यांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारची प्रतीक्षा आता संपली आहे. नवे रूप देण्यात आलेली ही डायनिंग कार शनिवारपासून रेल्वेच्या सेवेत पुन्हा दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.डेक्कन क्वीन आणि डायनिंग कार हे जणू समीकरणच बनले आहे. डायनिंग कारशिवाय ही गाडी धावणे प्रवाशांनीही कधीच मान्य केले नाही. तीन आठवड्यांपूर्वी ही कार देखभाल-दुरुस्तीसाठी माटुंगा यार्डात ठेवण्यात आली होती. तोपर्यंत गाडीला पॅन्ट्री कार जोडण्यात आली होती. त्यामुळे डायनिंग कार परत सेवेत कधी दाखल होणार, याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत होते.अखेर शनिवारी नव्या रूपातील कार डेक्कन क्वीनला मुंबई येथून जोडण्यात आली. नव्या कारची रचना व रंगसंगती आकर्षक करण्यात आली आहे. बैठकव्यवस्थाही वाढविण्यात आली असून हॉटेलप्रमाणे ही रचना असेल. तसेच, कारमध्ये चहूकडे डेक्कन क्वीनचा इतिहास सांगणारी छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या नव्या रूपाचे प्रवाशांकडूनही स्वागत केले जात आहे.
डेक्कन क्वीनची डायनिंग कार नव्या रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 3:59 AM