पुणे : पुण्यामध्ये गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. सामाजिक भान ठेवून ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत कार्य निष्ठेने सुरू आहे. सामाजिक क्षेत्रातील हे कार्य इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. दगडूशेठ हे देशाचे सांस्कृतिक वैभव आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले. ससून रुग्णालयातील बदल आणि खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे कामही ट्रस्टच्या माध्यमातून झाले आहे, असेही ते म्हणाले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग मित्रमंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन दळवी यांच्या हस्ते झाले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, हेमंत रासने, कुमार वांबुरे, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत मगर, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते.महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी भीमण्णा जाधव व सहकाऱ्यांचे सुंद्रीवादन झाले. जितेंद्र भुरुक व रेशमी मुखर्जी यांनी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या हम दोनो दो प्रेमी, जाने कैसे कब कहा अशा विविध गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.दगडूशेठ गणपती मंदिराला ३४ वर्षे पूर्ण झाली. ट्रस्टतर्फे दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवात अनेक दिग्गज आपल्या कलेद्वारे गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करतात. गणपती मंदिराच्या दानपेटीतील दान सामाजिक कार्यासाठी, लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी वापरले पाहिजे, अशी ट्रस्टची व कार्यकर्त्यांची धारणा आहे.- अशोक गोडसे
‘दगडूशेठ’ हे देशाचे सांस्कृतिक वैभव - चंद्रकांत दळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 3:05 AM