पुणे : मोरया, मोरया... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले. वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा 'जय गणेश स्वच्छता अभियान रथ' बेलबाग चौकात दाखल झाला.
त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्क पर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली होती. पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यात आली. याशिवाय देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन देखील झाले.
त्यापाठोपाठ स्व-रूपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामध्ये ध्वज, टाळ यांसह मर्दानी खेळ व ढोल-ताशा पथकही सहभागी झाले होते. दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यामागे केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता.
बेलबाग चौकामध्ये सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी मुख्य श्री स्वानंदेश रथ दाखल झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर पोलीस अधिका-यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर पुढे हा रथ मार्गस्थ झाला.
श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला. रथावर ८ खांब साकारण्यात आले होते. संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईल मध्ये देखील अनेकांनी छायाचित्र टिपले.
पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील पारंपरिक वेशात मोठया संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी श्रीं ची आरती व स्वागत देखील केले. टिळक चौकामध्ये सकाळी १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया... जय गणेश असा जयघोष झाला. त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले.
गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक जगभरातून घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी भाविकांना ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती. देश -परदेशातील भाविकांना देखील या सांगता मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा असते, मात्र, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे यंदा संपुर्ण सांगता मिरवणूक ट्रस्टची वेबसाईट http://www.dagdushethganpati.com यावरून भाविकांना घरबसल्या लाईव्ह पाहता आली.