पुणे: कोरोना संकटामुळे दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. मात्र, हा जल्लोष रात्री दहा वाजेपर्यंतच करता येणार असून, गोविंदांना रात्री दहाच्या आतच हंडी फोडावी लागणार आहे. तशी नियमावलीच पोलिसांनी जाहीर केली आहे. तशा सूचना देखील मंडळांना देण्यात आल्या आहेत. हा दहीहंडी उत्सव शुक्रवारी (दि. १९) होणार आहे.
दहीहंडीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी यंदा तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालणार्यांवर लक्ष ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच महिला छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पथके तैनात ठेवली आहेत.
मंडळांना आवाजाची मर्यादा देखील पाळावी लागणार आहे. जी मंडळे आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत. आवाजाची मर्यादा मोजण्यासाठी यंत्रणा घेऊन पोलिस हजर असणार आहेत. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळाना आपले कार्यकर्ते वाहतूक पोलिसांच्या मदतीला द्यावे लागणार आहेत. रुग्णावाहीका तसेच अग्निशमन दलाची वाहने गर्दीत अडकणार नाहीत याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे. शहरातील मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे विश्रामबाग व फरासखाना पोलिसांवर बंदोबस्ताची मोठी मदार असते.
दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे
दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. निर्धारीत केलेल्या नियमांनुसार रात्री दहाच्या आत मंडळांना आपली दहीहंडी फोडावी लागणार आहे. पोलिसांकडून मध्यभागातील मंडई परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवाजाच्या बाबातीत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक