बारामती : दहीहंडीचा उत्सव उत्साहाने साजरा करतानाच बारामती शहरातील दहीहंडी मंडळांनी सामाजिक जबाबदारी महत्त्वाची मानली आहे. त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीदेखील पुढाकार घेतला आहे. आज दहीहंडीनिमित्त झालेल्या बैठकीत अनेक दहीहंडी मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीसह दुष्काळी गावांतील जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्याचे टॅँकर आदींंची मदत करण्याचा निर्धार केला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. या वेळी सर्वच अधिकाऱ्यांनी दहीहंडी मंडळांनी दुष्काळाचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. त्याला बारामती फ्रेन्डस सर्कल दहीहंडी मंडळाचे संयोजक नगरसेवक सुनील सस्ते यांनी बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त अंजनगावासाठी रोख ५१ हजार रुपये जाहीर केले. तर भाजपाचे नितीन भामे यांनी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे सांगितले. खंडोबानगर येथील शिवक्रांती सामाजिक कला, क्रीडा प्रतिष्ठान दुष्काळग्रस्त भागातील गरीब कुटुंबाना धान्यवाटप केले जाणार आहे. तर याच मंडळांच्या वतीने १२ हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरने बारामती तालुक्यातील दुष्काळी भागात १५ दिवस पिण्याच्या पाण्याचे वाटप मोफत केले जाणार आहे, असे संयोजक चंद्रकांत लोंढे यांनी सांगितले. यंदा दुष्काळी स्थिती असतानाही बारामतीमध्ये दहीहंडी उत्सवाची संख्या वाढली आहे. मागील वर्षी ३८ मंडळांनी दहीहंडी उभारल्या होत्या. आता त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. दहीहंडी मंडळ उत्सवच जेमतेम ३ ते ४ तासांचा असतो. त्यामुळे या उत्सवात प्रशासनाने फार ताणू नये, असे मंडळाच्या उपस्थित असलेल्या प्रमुखांनी सांगितले. बारामती बॅँकेचे संचालक सचिन सातव, नगरसेवक सुनील सस्ते, नीलेश इंगुले, करण इंगुले, अॅड. नितीन भामे, संतोष गालिंदे, अभिजित काळे, रूतूराज काळे, सतीश फाळके, पप्पू बल्लाळ, अॅड. विनोद जावळे, किशोर मासाळ आदींनी चर्चा केली. दहीहंडीला सहासी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने मंडळांना सहकार्य करावे, अशी मागणी अॅड. भामे, सुनील सस्ते यांनी केली. आवाजावर मर्यादा ठेवादहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार डीजेच्या आवाजावर निर्बंध आले. त्याचे पालन मंडळांनी करावे, उत्सवादरम्यान आवाजाची घनता तपासण्यात येणार आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाई होईल, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले. विधायक उपक्रम राबवादहीहंडी उत्सवात मागील दोन वर्षांतील अनुभव चांगले नाही. त्यामुळे सर्वच मंडळांनी काळजी घेण्याची गरज आहे. दुष्काळामुळे सामाजिक शांततादेखील धोक्यात आहे. त्यामुळे विधायक कामावर लक्ष अधिक द्यावे, असे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
दहीहंडीचे थर... अन् सामाजिक मदतीवर भर!
By admin | Published: September 06, 2015 3:23 AM