पुणे : समान पाणी योजनेतील जलवाहिन्या बदलण्याच्या कामासाठी काढलेल्या तब्बल २०० कोटी रुपये कर्जाच्या व्याजाचा हप्ता दररोज ५ लाख रुपये इतका असून दरमहा दीड कोटी रुपये निव्वळ व्याजापोटी महापालिकेला जमा करावे लागणार आहेत. कर्जरोखे काढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या घाईची अशी भरमसाट किंमत महापालिकेला किमान ६ महिने तरी चुकवावी लागणार आहे. महापालिकेचे ९ कोटी रुपये फुकट जाणार आहेत.जलवाहिन्या बदलण्याच्या कामाची निविदा गुरुवारी रद्द केल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांकडूनही प्रशासनावर आगपाखड करण्यात आली. लोकप्रतिनिधींना गृहीत धरून सर्व कामकाज करणाºया आयुक्तांना त्यांच्याच कामाचा धडा मिळाला, असे बोलले जात होते. स्वयंसेवी संस्थांनी संबंधित अधिकाºयांच्या वेतनातून हा खर्च वसूल करावा, अशी मागणी करणारे निवेदन सरकारला पाठविले. विरोधकांनी, आयुक्तांवर दबाव न टाकू शकणारे सत्ताधारीही याला जबाबदार आहेत; त्यांच्या खासदार व मुख्यमंत्र्यांना जे कळते ते यांना कळत नाही, अशी टीका केली.दरम्यान, प्रशासनाने आता कर्जाऊ म्हणून काढलेले २०० कोटी रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मुख्य लेखा अधिकाºयांना त्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र बँक व आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज काढण्यात आले आहे. हीच रक्कम पुुन्हा त्याच बँकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवली, तर त्यांचे पैसे त्यांच्याकडूनच घेऊन पुन्हा त्यांना वापरायला दिले जाण्याची नामुष्की महापालिकेवर येईल. त्यामुळे दुसºया राष्ट्रीयीकृत बँकांचा विचार मुदत ठेवीसाठी करण्यात येणार आहे. मुदत ठेवीवर मिळणारे व्याज व कर्जावर द्यावे लागणार व्याज यांत किमान दीड टक्क्याचा तरी फरक राहील. मुदत ठेवीवर महापालिकेला दरमहा जास्तीत जास्त व्याज दर धरला तरी १ कोटी रुपये व्याज मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कर्जापोटी महापालिका दरमहा दीड कोटी रुपये देणार आहे. २०० कोटी मुदत ठेवीत ठेवले तरीही दरमहा ५० लाखांचा तोटा होणारच आहे.
कर्जरोख्यांच्या घाईचा रोजचा खर्च ५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:49 AM