-प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाण्याचे मीटर बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. दररोज सरासरी ५०० मीटर बसवले जात आहेत. मीटरला विरोध होत असल्यास पोलिसांना पाचारण करून गुन्हा दाखल केला जात आहे. पाण्याचे मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यावर ४ सदस्यांच्या एका कुटुंबाला दर दिवशी १३५ लीटर पाणी लागत असेल, तर अंदाजे ४ रुपये खर्च येईल आणि सध्या भराव्या लागणाऱ्या पाणीपट्टीमधून नागरिकांची सुटका होईल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे. जेवढे पाणी वापराल, त्यानुसार बिलही येणार आहे.
शहरात पर्वती, भामा, वारजे, कॅन्टोन्मेंट, वडगाव या पाच प्रकल्पांतर्गत पाण्याचे मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. पाचही प्रकल्पांमध्ये मिळून एकूण २ लाख ४८ हजार ५३७ मीटर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या त्यापैकी ६५ हजार ५६४ मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक प्रकल्पामध्ये उपविभाग करण्यात आले आहेत. पर्वतीअंतर्गत १२, भामाअंतर्गत ३७, वारजेअंतर्गत ३४, कॅन्टोन्मेंटमध्ये २५ आणि वडगावमध्ये ३५ उपविभाग करण्यात आले आहेत. शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी १०० टक्के मीटर बसवले जाणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, पर्वती प्रकल्पातील ५ झोनमध्ये ९० टक्क्यांहून जास्त पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. मीटर बसवण्याचे काम मात्र केवळ २६ टक्केच झाले आहे. भामा प्रकल्पातील ३१ झोनमध्ये, वारजेअंतर्गत ९ झोनमध्ये, वडगावमध्ये २३ झोनमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. सर्व प्रकल्पांमधील मिळून २७ झोनमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त मीटरचे काम झाले आहे. कॅन्टोन्मेंट प्रकल्पामध्ये अद्याप महापालिकेकडून एकही मीटर बसवण्यात आलेला नाही.
मीटर बसवताना कोंढवा आणि सिंहगड रस्ता परिसरातील ५ ठिकाणी मीटर बसवताना स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. मात्र, पोलिसांची मदत घेऊन काम पूर्ण करण्यात आले. मीटर बसवण्याचे काम सुरू असतानाच वॉटर ऑडिटही सुरू करण्यात आले आहे. यामध्ये चरवड वस्ती, केदारेश्वर, सनसिटी, सिंहगड रोड अशा परिसरांचा समावेश आहे. २४ बाय ७ योजनेचे काम प्रायोगिक तत्त्वावर म्हस्के वस्ती येथे सुरू करण्यात आले आहे.
मार्च २०२३ पर्यंत मीटर बसविण्याचे काम पूर्ण
पाण्याचा पुरवठा मोजणी करून झाल्यास अपव्यय आणि गैरवापर कमी होतो. मात्र मीटरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यास जास्त बिल येईल या काळजीने आणि मीटर बिलामध्ये मानवी हस्तक्षेप होईल या भीतीने विरोध करण्यात येत आहे. याशिवाय पाण्याचे मीटर बसविल्यानंतर काही वर्षांनी मीटरमध्ये गाळ बसला तर पाण्याचा पुरवठा कमी होईल, अशा भीतीनेही विरोध करण्यात येत आहे. वास्तविक, महानगरपालिका दर पंधरा दिवसांनी मीटरमधील गाळ काढण्याचे काम करणार आहे. मुख्य सभेने पाण्याच्या मीटरच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून मार्च २०२३ पर्यंत मीटर बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या कालावधीत मीटर बसवण्यासाठी कोणताही दर आकारला जाणार नाही.
सध्या पाण्याचा दर ७ रुपये ५० पैसे किलोलीटर इतका आहे. मुख्य सभेच्या ठरावाप्रमाणे मार्च २०२३ पर्यंत बसवण्यात आलेल्या मीटरसाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक दरवर्षी भरत असलेल्या टॅक्समध्ये एका कुटुंबाला साधारणपणे २ ते ४ हजार रुपये पाणीपट्टी (वॉटर टॅक्स) भरावा लागतो. मीटरवर बिलिंग सुरू झाल्यावर हा कर भरावा लागणार नाही. सध्या वॉटर ऑडिट सुरू असून मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यावर बिलिंग सुरू केले जाईल. सोसायट्यांमध्ये मीटर बसवल्यावर बिलिंगची रक्कम विभागली जाऊ शकते.
- नंदकिशोर जगताप, उपअधीक्षक अभियंता
प्रकल्प झोन मीटरचे उद्दिष्ट बसवलेले मीटर
पर्वती १२ ३७२५१ ८८५०
भामा ३७ ५३७०४ १३६०८
वारजे ३४ ३८९९९ १७८४६
कॅन्टोन्मेंट २५ ४९०४४ ०
वडगाव ३५ ६९५३९ २५२६०
-----------------------------------
एकूण १४३ २,४८,५३७ ६५,५६४