आळेफाटा : बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून करून उज्जैन, मध्य प्रदेश येथे पळून जाणाच्या तयारीत असणाऱ्या मेव्हण्याला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील कैलास महादू भंडलकर वय ३२ (राहणार मोरदरा, वडगाव आनंद, तालुका जुन्नर) असे खून झालेल्या दाजीचे आहे.
आळेफाटा पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १०) पुणे-नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल फाऊंटनच्या पाठीमागे मोरदरा रोडलगत आतमध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीची नोंद आळेफाटा पोलिसात दाखल केली होती. आरोपीची ओळख पटविण्यासाठी तसेच माहिती काढण्यासाठी पोलिस पथके तयार केली. त्याअनुषंगाने मृत व्यक्तीचे कैलास भंडलकर असे नाव आहे. मृत व्यक्तीला कपड्यावरून, चप्पलवरून त्यांची पत्नी नाजुका कैलास भंडलकर हिने ओळखले. त्यानंतर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र आळे याठिकाणी झाले. त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणत्यातरी टणक हत्याराने मारल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अहवाल प्राप्त झाल्याने त्याच्या पत्नीने दिलेल्या तकारीवरून आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास सुरू केला असता, आरोपी उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाणार आहे, अशी माहिती पोलिस पथकास मिळाली. त्याला पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. गणेश दादाभाऊ मदने (वय २४, रा. रामवाडी, खापरवाडी ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने सांगितले की, ''कैलास महादू भंडलकर हा माझ्या बहिणीला त्रास देत होता. तसेच त्याला समजावून सांगितले, तरीपण तो ऐकत नव्हता. यामुळे मी त्यास ३१ जुलै रोजी दुपारी ३:१५ वाजता सुमारास हॉटेल फाऊंटनच्या पाठीमागे मोरदरा रोडलगत आतमध्ये जंगलामध्ये घेऊन जाऊन माझ्या साथीदारांच्या मदतीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला'', अशी कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.