नीरा : जेजुरी गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे नियोजित अनावरण शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधीच शुक्रवारी पडळकरांनी पुतळा अनावरणाचा प्रयत्न केला. त्यानंतर पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकरांचा निषेध केला.
शुक्रवारी पहाटे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावर करण्याचा प्रयत्न केला. जेजुरी पोलिसांनी पुतळा अनावरणाचा प्रयत्न हानून पाडला. पण पडळकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनौपचारीक अनावरण झाल्याचे जाहीर करत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या घटनेचा निषेध नीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने पडळकरांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भय्या खाटपे, पुरंदर तालुका युवक उपाध्यक्ष अक्षय निगडे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, कांचन निगडे, प्रमोद काकडे, अजित सोनवणे, अनिल चव्हाण, ऋषी धायगुडे, अजय राऊत, सुनील चव्हाण, दयानंद चव्हाण, सुधीर शहा यांनी निषेधार्थ मनोगत व्यक्त केले.
पडळकरांना यापुढे पुरंदर तालुक्यात फिरकूही न देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी दिला. जेजुरी पोलिसांनी पडळकरांना रोखत पुतळा अनावरणाच प्रयत्न हानुन पाडला. जेजुरी पोलिसांचे आम्ही कौतुक करतो. पडळकरांच्या या भ्याड कार्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भय्या खाटपे यांनी व्यक्त केले. बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेले, पडळकर स्टंटबाजी व प्रसिद्धीच्या सोसापाई असे बेताल वक्तव्य करत असल्याचे मत माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे यांनी व्यक्त केले.