लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बंद घरात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला. गळफास घेतल्याने मृत्यू असे प्राथमिक कारण डॉक्टरांनी नमूद करून व्हिसेरा राखून ठेवला. सर्वांनीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मानून अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीचा इतका वेळ राखून धरलेला बांध फुटला. ती ओकसाबोकशी रडू लागली. तेव्हा तिचे नातेवाईकांनी सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रडत ती म्हणाली, मम्मीने पप्पाला मारले, ही बाब खडक पोलिसांना समजली. पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने गुन्हा कबूल केला. चारित्र्याच्या संशयावरून होणाऱ्या वादातून पतीला मारल्याचे सांगितले.
दीपक बलवीर सोनार (वय ३६, रा. गुरुवार पेठ) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर त्याची पत्नी राधिका दीपक सोनार (वय ३४) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दीपक सोनार हे जुन्या वाड्यात रखवालदाराचे काम करत होते. ते गुरुवार पेठेतील एका वाड्यात पत्नी व मुलीसह राहत होते. राधिका ही मध्यवस्तीतील एका कपड्याच्या दुकानात काम करते. दीपक याला दारूचे व्यसन आहे. त्यातूनच पत्नी कामावरून घरी रात्री उशिरा आल्यास संशय घेत असे. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी रात्री राधिका कामावरून आल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी तिने दीपक याला लाकडी बॅटने मारहाण केली. त्यानंतर त्याचा जोरात गळा दाबला. त्यात दीपकचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दीपकचा मृतदेह उचलून बाथरूमध्ये दोरीने लटकला. दोन दिवस ती बाहेर गेली. परत आल्यानंतर तिने पतीने गळफास घेतल्याचा गाजावाजा केला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. दरम्यान, ससून रुग्णालयातूनही शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळफास घेतल्याने मृत्यू असे नमूद केले गेले. त्यामुळे खडक पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली.
------------------------
राधिका हिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीला दम देऊन गप्प राहण्यास सांगितले होते. त्यामुळे सोमवारपासून ही मुलगी गप्प गप्प होती. पोलिसांनी विचारणा केल्यावरही तिने वडिलांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते. त्यामुळे दीपक याने आत्महत्या केली असे सर्व जण समजून अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कार करत असताना मुलीचा बांध फुटला. ती रडायची थांबेना. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी चौकशी केली. त्यावर तिने मम्मीने पप्पाला मारले, असे सांगितले. ही बाब पोलिसांपर्यंत पोहचली. त्यानुसार पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी पाटील यांनी सांगितले.