पुणे : खडकवासला धरण प्रकल्प क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात वाढत चालला आहे. मात्र,चारही धरण क्षेत्रांत गेल्या वर्षापेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी यंदा धरणांत मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ०.८० टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. परंतु, पुढील आठवडाभर चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात अधिक वाढ होईल, अशी शक्यता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
पुणे महापालिका व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षी १८ जुलै २०२० रोजी ९.०५ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. तर १८ जुलै २०२१ रोजी ९.८५ पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा धरण प्रकल्पात केवळ ०.८० टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. रविवारी शहरातील विविध भागात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. मात्र, सायंकाळी ५ वाजेपंर्यंत खडकवासला धरण क्षेत्रात २ मि.मी.,पानशेत धरण परिसरात ३७ मि.मी.,वरसगाव धरण क्षेत्रात ३९ मि.मी. तर टेमघर परिसरात १० मि.मी.पावसाची नोंद झाली.
पाऊस कमी पडूनही सुमारे महिनाभरापूर्वी धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत दीड ते दोन टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याचे दिसून येत होते. मात्र,आता पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत केवळ पाऊण टीएमसीने अधिक असल्याचे दिसत आहे. खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या हंगामाचा विचार करता सुमारे १०० ते २०० मि.मी.पाऊस कमी पडला आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास सर्व धरणे लवकर भरतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------------
खडवासला धरण प्रकल्पातील रविवारचा पाणीसाठा
खडवासला : ०.७०, पानशेत :४.४६, वरसगाव : ३.९२, टेमघर : ०.७७
----------------------------------
चारही धरणांतील १ जून ते १८ जूनपर्यंतची पावसाची आकडेवारी (मि.मी.)
धरणाचे नाव मागील वर्षाचा पाऊस यंदा पडलेला पाऊस
खडवासला २७८ २४२
पानशेत ६४८ ५२५
वरसगाव ६१४ ५११
टेमघर ९३२ ७२१
------------------------------------------