देऊळगावराजे : दौंड तालुक्यातील हातपंपांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून एक हातपंपामागे १ हजार रुपये पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून घेतला जातो. मात्र पैसे घेऊनही हातपपांची दुरुस्ती न झाल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ््यात भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात एकूण १४0४ हातपंप आहेत. दरम्यान प्रत्येक हातपंपांच्या देखभालीसाठी वर्षाला १ हजार रुपये प्रमाणे १४ लाख ४ हजार रुपये वसूल झाले आहेत. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणावर हातपंप नादुरुस्त आहेत. केवळ एकट्या देऊळगावराजेमध्ये २२ पैकी ११ हातपंप नादुरुस्त आहेत. अशीच परिस्थिती तालुक्यातील काही गावांमध्ये आहे. परिणामी नादुरुस्त हातपंपाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविलेला आहे. मात्र याबाबत कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे केवळ पंचायत समितीच्या उदासिन धोरण आणि नादुरुस्त असलेल्या हातपंपांमुळे ग्रामीण भागातील काही गावात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. तेव्हा यासंदर्भात योग्य ती चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
दौंड तालुक्यात हातपंप नादुरुस्त
By admin | Published: May 13, 2014 2:43 AM