- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात चारही धरणांत आतापर्यंत २०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी याच कालावधीत १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले शेतीचे आवर्तन ५ जूनपासून बंद केले जाणार असून येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.मागील वर्षी पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणे अगदी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली होती. टेमघर धरणास गळती लागल्यामुळे दुरुस्तीसाठी संपूर्ण धरणातील पाणीसाठा रिकामा करावा लागला. परिणामी, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणातील पाणीसाठ्यावर अवंलबून राहण्याची वेळ आली. मात्र, जलसचिंन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेती, तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे.जलसिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश कपोले म्हणाले, ‘‘टेमघर आणि वरसगाव धरणात पाणीसाठा नाही. मात्र पानशेत धरणात ४८.४० आणि खडकवासला धरणात ३४.९३ टक्के पाणीसाठा आहे. एकूण २०.०५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षापेक्षा हा साठा सुमारे २.५० टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, मॉन्सूनचा अंदाज घेऊन शासन आदेशानुसार १५ जुलैपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल.’’